शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय ज्ञानाची संधी द्या – आ. सत्यजीत तांबे 

शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय ज्ञानाची संधी द्या – आ. सत्यजीत तांबे

– शेतकऱ्यांसाठी परदेशी अभ्यास दौरे पुन्हा सुरू करण्याची केली मागणी

– आधुनिक शेतीसाठी जागतिक अनुभव आवश्यक

 

 

प्रतिनिधी,

 

राज्यातील तरुण व प्रगतशील शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अनुभव घेता यावा यासाठी कृषी विभागाकडून यापूर्वी परदेशी अभ्यास दौरे आयोजित केले जात होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हे दौरे पूर्णतः थांबले असून त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे. हे अभ्यास दौरे पुन्हा सुरू करून शेतकऱ्यांना जागतिक स्तरावरचे ज्ञान मिळावे, यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी विधानपरिषदेत ठामपणे आवाज उठवला आहे.

 

यापूर्वी कृषी विभागाच्या वतीने राज्यातील निवडक शेतकऱ्यांसाठी परदेशी अभ्यास दौरे आयोजित केले जात होते. लॉटरी पद्धतीने अर्जांची निवड करून शेतकऱ्यांना अमेरिका, इज्रायल, नेदरलँड्स, जपान यांसारख्या देशांमध्ये शेती, प्रक्रिया उद्योग, सिंचन व्यवस्थापन, सेंद्रिय शेती आणि तंत्रज्ञान आधारित शेती पद्धतींचा अभ्यास करण्याची संधी दिली जायची.

 

या दौऱ्यांचा राज्यातील शेती क्षेत्रावर सकारात्मक प्रभाव पडला होता. अनेक शेतकऱ्यांनी परदेशातून शिकलेले तंत्रज्ञान आपल्या शेतात राबवले आणि उत्पादन, प्रक्रिया व विपणन व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा घडवून आणली.

 

मात्र, मागील काही वर्षांपासून हे दौरे पूर्णपणे थांबले आहेत. परिणामी तरुण शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढला आहे. आधुनिक शेतीच्या दिशेने त्यांना चालना मिळावी आणि आंतरराष्ट्रीय अनुभवातून नव्या संधींचा लाभ घेता यावा, यासाठी हे दौरे पुन्हा सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे, असे आमदार सत्यजीत तांबे यांनी सभागृहात स्पष्ट केले.