TAS मधील विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षेचे धडे- वाहतूक पोलिसांनी केले मार्गदर्शन

TAS मधील विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षेचे धडे- वाहतूक पोलिसांनी केले मार्गदर्शन

 

प्रतिनिधी,

 

पुण्यातील ‘द अ‍ॅकॅडमी स्कूल’ (TAS) मधील विद्यार्थ्यांना पुणे वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरक्षेचे महत्त्व शिकवण्यात आले. विशेषतः नर्सरी ते दुसरी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

 

या उपक्रमाअंतर्गत वाहतूक पोलिसांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. शाळेच्या व्यवस्थापन आणि वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी मिळून शालेय सभागृहाचे रूपांतर एका छोट्या ट्रॅफिक सिम्युलेटरमध्ये केले होते. यामध्ये रस्ते, सिग्नल्स, झेब्रा क्रॉसिंग आणि विविध वाहतूक चिन्हांसह इतर दृश्य साहित्यांचा समावेश होता.

 

विद्यार्थ्यांना त्यांच्या वयाच्या अनुरूप आणि सोप्या पद्धतीने रस्ता सुरक्षेबाबत प्राथमिक माहिती देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. पोलिस अधिकाऱ्यांनी सहज समजणाऱ्या भाषेत आणि प्रात्यक्षिकांच्या साहाय्याने झेब्रा क्रॉसिंगचा योग्य वापर, सिग्नलचे पालन, वाहतूक चिन्हांची ओळख, तसेच सीट बेल्ट आणि हेल्मेट वापरण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

 

‘द अ‍ॅकॅडमी स्कूल’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैथिली तांबे यांनी सांगितले की, “हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे. त्यांना वाहतुकीचे नियम केवळ पुस्तकी ज्ञानाद्वारे नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभवातून शिकवणे अधिक परिणामकारक ठरते. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि प्रत्यक्ष अनुभवातून वाहतूक सुरक्षेचे धडे आत्मसात केले.”