औरंगाबाद महामार्गावर पाळधी (पहूर ) जवळ तीन वाहनांची टक्कर होवून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली .

पहूर , ता . जामनेर दि . १२ ( प्रतिनिधी ) : – जळगाव औरंगाबाद महामार्गावर पाळधी (पहूर ) जवळ तीन वाहनांची टक्कर होवून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली .

याबाबत सविस्तर वृत्त असे की , आज सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पहुर येथून जवळच असलेल्या पाळधी शिवारात तुकाराम ज्योतीराम पाटील यांच्या शेताजवळ दुचाकी (क्र.एम . एच . १९ डी आर . १४१९ ) वरील धनंजय गंगाराम सपकाळे ( किनोदकर ) (वय ४० रा. स्टेट बँक कॉलनी जळगांव आणि पंकज मोहन तायडे ( वय ३० वाल्मीक नगर , जळगांव ) दोघे जण जळगांव कडे जात होते . महामार्गावर दुभाजक असतानाही विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या स्विप्ट डिझायर ( क्र .एम . एच . १९ सी . यु . ७१६१ ) कारने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात कार चालक प्रविण प्रकाश पाटील (वय – ४ २ रा भराडी , ता .जामनेर ) यांच्या सह दुचाकीवरील धनंजय सपकाळे यांचा जागीच मृत्यू झाला तर पंकज तायडे हे गंभीर जखमी अवस्थेत जळगांव येथे उपचारार्थ हलविले असता त्यांची प्राणज्योत मालवली . त्यातच जळगांव कडे जाणाऱ्या बोलेरो ( क्र . एम .एच . २० सी जी ८००० ) गाडी चालकाचेही समोरील अपघात झाल्याने वाहनावरील नियंत्रन सुटल्याने स्विप्ट कारवर धडकली. अपघात इतका भयंकार होता की , दुचाकीस्वाराच्या शरीराराचे अवयव सुमारे १०० फुट पेक्षा अधिक अंतरावर फेकल्या गेले .
मयत धनंजय किनोदकर व पंकज तायडे हे फॉर्च्यून फायनान्स कंपनीत वसूली अधिकारी म्हणून कार्यरत असल्याचे समजते . तसेच मयत प्रविण पाटील हे भराडी येथील प्रगतीशिल शेतकरी होते . त्यांच्या पश्च्यात पत्नी , २ मुले , मुलगी असा परिवार आहे .

महामार्ग पोलीसांची मदत

ट्राफिक हवलदार गुलाब मनोरे , रफीक तडवी , विजय साळुंखे नितीन सपकाळे , युसुफ शेख यांनीही घटनास्थळ गाठून जखमींना सहकार्य करत रहदारी नियंत्रित केली .

अपघाताची वार्ता समजताच पाळधी येथील पद्माकर पाटील योगेश बॉम्बे कैलास परदेशी दीपक चौधरी कमलाकर पाटील मनोज नेवे आदींनी मदत केली . १०८ द्वारे जखमीस जळगाव येथे हलविण्यासाठी सहकार्य केले .पहूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील नाईक यांनी सहकारी रवींद्र देशमुख .,भरत लिंगायत, अनिल राठोड यांच्यासह घटनास्थळी धाव घेवून महामार्गावरील रहदारी सुरळीत करण्याकामी सहकार्य केले . मयत किनोळकर आणि पाटील यांचे शवविच्छेदन पहूर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले . याप्रकरणी भराडी येथील पद्माकर पाटील यांच्या फिर्यादीवरून पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे करीत आहेत .