चोपडा महाविद्यालयात ‘स्त्री शक्तीचा जागर’ कार्यक्रम उत्साहात साजरा

चोपडा महाविद्यालयात ‘स्त्री शक्तीचा जागर’ कार्यक्रम उत्साहात साजरा

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील मानसमित्र समुपदेशन केंद्र व मानसशास्त्र विभाग यांच्यातर्फे ‘स्त्री शक्तीचा जागर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मा. उपप्राचार्य श्री.एन.एस.कोल्हे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले व कै.मा.ना.अक्कासो.सौ. शरच्चंद्रिका सुरेश पाटील (माजी शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कल्याणी पाटील व अंजली धीवर या विद्यार्थिनींनी सुरेल स्वागत गीत सादर केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ.आर.आर.पाटील म्हणाले की, ‘क्रांतिकारी स्त्रियांच्या उज्वल इतिहासाला व त्यांच्या कार्याला उजाळा मिळावा, समाज सुधारक स्त्रियांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी तसेच त्यांच्या चरित्रातून प्रेरणा मिळावी आणि विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा हा या कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश आहे’. या कार्यक्रमाप्रसंगी उदघाटक उपप्राचार्य श्री.एन. एस.कोल्हे, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, उपप्राचार्य श्री.बी.एस.हळपे, रजिस्ट्रार श्री.डी. एम.पाटील, सौ.एम.टी.शिंदे, मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ.आर.आर.पाटील, श्री.एस.बी.देवरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी भैरवी पाटील हिने राजमाता जिजाऊ, अश्विनी बाविस्कर हिने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, प्रेरणा कन्हैये हिने सावित्रीबाई फुले, प्रेरणा बडगुजर हिने कै. मा.ना.अक्कासो सौ.शरच्चंद्रिका सुरेश पाटील (माजी शिक्षणमंत्री,महाराष्ट्र राज्य), सारिका माळी हिने झाशीची राणी लक्ष्मीबाई, कांचन सुरेश पाटील हिने ताराबाई शिंदे, वैष्णवी पाटील हिने आनंदीबाई जोशी, माया धनगर हिने कवयित्री बहिणाबाई चौधरी, शुभांगी बाविस्कर हिने रमाबाई आंबेडकर, विजया सपकाळे हिने सिंधुताई सपकाळ, प्रियंका पावरा हिने इंदिरा गांधी, वैष्णवी धनगर हिने कल्पना चावला इत्यादी विद्यार्थ्यीनींनी समाज सुधारक व क्रांतिकारी स्त्रीयांच्या भूमिकेतून त्यांच्या कार्याचा परिचय करून दिला तसेच भावी पिढीला मोलाचा संदेश दिला.
याप्रसंगी डी.एस.एम हा कोर्स पूर्ण केल्याबद्दल श्री.एस.टी. शिंदे, श्री.एस.बी. देवरे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना उपप्राचार्य श्री.एन.एस.कोल्हे म्हणाले की, ‘चरित्र वाचनातून महान विचारांचा परिचय होतो. तसेच समाज सुधारण्याची प्रेरणा मिळते. अडीअडचणींवर मात करून तेजस्वी जीवन जगण्याची कला समाज सुधारकांच्या चरित्रातून शिकायला मिळते. महान व्यक्तींच्या चरित्राचे वाचन करावे व त्यांच्या विचारांचे अनुकरण करून उत्तम जीवन जगावे’. यावेळी त्यांनी क्रांतिकारी व समाजसुधारक स्रियांच्या भूमिकेद्वारे कार्याचा परिचय करून देणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु.माहेश्वरी धनगर हिने केले तर आभार श्री.एस.बी. देवरे यांनी मानले
या कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.