वाचन संस्कृती जोपासणे गरजेचे – मा.वैशाली सुर्यवंशी

वाचन संस्कृती जोपासणे गरजेचे – मा.वैशाली सुर्यवंशी

पाचोरा:- निर्मल इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिक्षक दिन अतिशय उत्साहात संपन्न झाला.प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या अध्यक्षा आदरणीय सौ. वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांची विशेष उपस्थिती होती.प्रथमतः सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.शाळेतील सर्व शिक्षकांचे भेटवस्तू देऊन माननीय सौ वैशाली सुर्यवंशी यांनी स्वागत केले. शाळेतील कला शिक्षक श्री.शैलेश कुलकर्णी यांनी साकारलेल्या कलेचे सादरीकरण करण्यात आले.सौ. वैशाली सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतात उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले.आताची पिढी हे वाचन संस्कृती पासून दूर गेलेली आहे.मोबाईलच्या अति वापरामुळे विद्यार्थी वाचनापासून दूर गेले आहेत.शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करून वाचन संस्कृतीचे संवर्धन कसे होईल यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत.त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये संस्कार आणि मूल्य रुजविले पाहिजेत.विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास करून त्याचा सर्वांगीण विकास केला पाहिजे.पुस्तकांच्या पलिकडे देखील शिक्षण दिले गेले पाहिजे.विद्यार्थी शैक्षणिक दृष्ट्या प्रगल्भ होईलही परंतु शारीरिक दृष्ट्या तो विकलांग होणार नाही याची देखील काळजी घेतली पाहिजे.मैदानी खेळांना महत्त्व दिले पाहिजे.विद्यार्थी मैदानावर जेवढा खेळेल तेवढा तो सशक्त होईल आणि त्याचा सर्वांगीण विकास होईल असे सांगून शिक्षकांमध्ये नावीन्यपूर्ण पिढी घडविण्याचे सामर्थ्य आहे त्यासाठी त्याने अद्ययावत राहणे गरजेचे आहे असे नमूद करून सर्व शिक्षकांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी संस्थेचे सचिव मा. श्री नरेंद्रसिंग सुर्यवंशी, प्राचार्य श्री. गणेश राजपूत, उप प्राचार्य श्री. प्रदिप सोनवणे, समन्वयक सौ. स्नेहल पाटील, शाळेचे जनसंपर्क अधिकारी शाही जोसेफ तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मयुरी जकातदार यांनी केले तर आभार सौ.सोनाली बोरसे यांनी अभिव्यक्त केलेत.