‘१०८’ रुग्णवाहिकेने नऊ वर्षांत वाचवले अडीच लाखांहून अधिक रूग्णांचे प्राण !
१०८ सेवा अधिक जलद व तत्पर करावी, मोफत सेवेबाबत नागरिकांपर्यंत माहिती पोहचवा जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
जळगाव,दि.१३ ऑक्टोंबर रूग्णांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ वैद्यकीय उपचार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘१०८ रुग्णवाहिके’ मुळे गेल्या नऊ वर्षांमध्ये जिल्ह्यातील २ लाख ७१ हजार ८७५ नागरिकांचे प्राण वाचले आहेत. हृदयविकाराचे रूग्ण, अपघातग्रस्त व्यक्ती ते गर्भवती महिला अशा अनेकांचा यामध्ये समावेश आहे. ५१ हजार ५०३ महिलांना प्रसुतीसाठी रुग्णालयात हलविण्यात यश आले असून १ हजार १९८ बाळांचा जन्म रूग्णवाहिकेत झाला आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ‘१०८’ या आपत्कालीन रूग्णसेवेचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला असून रूग्णांना जलद व तत्पर सेवा देण्याचे काम रूग्णवाहिकांनी करावे. या मोफत सेवेबाबत नागरिकांपर्यंत माहिती पोहचवावी. अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, बीव्हीजी इंडिया कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक डॉ.राहूल जैन, जिल्हा समन्वयक आतिष सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमोर ‘१०८’ रूग्णवाहिकेच्या रूग्णसेवेची आकडेवारी सादर करण्यात आली.
कोरोना काळात देखील ‘१०८’ रूग्णवाहिकेने मोलाची भूमिका निभावली असून या रूग्णवाहिकेमध्ये कृत्रिम श्वसन यंत्रणा, औषधी, शॉक मशिन, ऑक्सिजन सिलेंडर व सोबत डॉक्टर उपलब्ध राहत असल्यामुळे आरोग्य विभागावरील बराच ताण कमी झाला आहे. राज्यात २०१४ पासून सप्टेंबर २०२३ पर्यंत ९१ लाख २१ हजार ९७४ रुग्णांना १०८ रूग्णवाहिकेमुळे जीवदान मिळाले आहे.
*कोविड काळातही महत्त्वाची भूमिका*
कोरोना काळात ३५ रुग्णवाहिकांनी १५ हजार ७९३ कोविडच्या रुग्णांना सेवा दिली असून १ लाख १६ हजार ९१६ नॉन कोविड रुग्णांसाठी मार्च २०२० ते सप्टेंबर २०२३ दरम्यान सेवा बजावली आहे. तसेच विविध आजारांच्या ६४ हजार ४५८ रुग्णांना रूग्णवाहिकेने सेवा दिली आहे.
रूग्णांना मिळाली संजीवनी
जळगाव जिल्ह्यात २०१४ पासून ते आतापर्यंत अपघातग्रस्त २० हजार ६२५ रूग्ण तसेच हाणामारीचे ४ हजार ४१५ रुग्णांना तर, १ हजार ४५ जळीत रूग्णांना, त्याच प्रमाणे छातीत दुखण्याचे १ हजार ५५८ रुग्ण, उंचावरून पडणे ४ हजार ५२८ रुग्ण, विषबाधा झालेले १२ हजार ६४६ रुग्णांना, इलेक्ट्रिक शॉक लागलेल्या ३२५ रुग्णांना, ७९५ मोठ्या अपघातातील रुग्णांना सेवा दिली आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ३३१ रूग्णांना सेवा मिळाली आहे.
वाढत्या दुर्घटना लक्षात घेऊन रुग्णाला तात्काळ आरोग्य सेवा मिळावी यासाठी बीव्हीजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था व एनएचएम महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘१०८’ रुग्णवाहिका सुरू केली असून आपातकालीन वैद्यकीय सेवा मिळवण्यासाठी ‘१०८’ रुग्णवाहिकेचा मोठा आधार मिळत आहे. असे डॉ. राहुल जैन यांनी सांगितले.
रुग्णवाहिका कशी उपलब्ध होते
राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‘१०८ रुग्णवाहिका’ सेवा ही तातडीच्या उपचारांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. १०८ या मोफत मदत क्रमांकावर (टोल फ्री क्रमांकावर) संपर्क साधून ही रुग्णवाहिका मागवणे शक्य आहे. १०८ च्या सुसज्ज आणि अद्ययावत नियंत्रणकक्षाद्वारे नजीकच्या रुग्णवाहिकेला रुग्णापर्यंत पोहोचण्यास मदत केली जाते. त्यामुळे कमीत कमी वेळात प्राथमिक, तसेच अनेकदा अगदी तातडीचे उपचारही १०८ मध्ये उपलब्ध झाल्याने रुग्णांचा जीव वाचतो.