कर्जाने येथे रासेयो स्वयंसेवकांनी श्रमदानातून निर्माण केला वनराई बंधारा

कर्जाने येथे रासेयो स्वयंसेवकांनी श्रमदानातून निर्माण केला वनराई बंधारा

चोपडा:येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित, कला,शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय चोपडा राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर कर्जाने (ता. चोपडा) येथे दिनांक १९-२५ जानेवारी २०२३ या कालावधीत आयोजित केले असून त्यादरम्यान विविध लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. त्यातीलच एक उपक्रम म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेच्या एककामार्फत कर्जाने गावालगत रानबंधारा तयार करण्यात आला.
कर्जाने हे गाव राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे दत्तक घेण्यात आलेले आहे. कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व राष्ट्रीय सेवा योजना यांनी दिलेल्या सूचनेनुसार रासेयो स्वयंसेवकांनी शिबिर कालावधीत श्रमदान करून गावाच्या विकासात्मक उपक्रमात सहभाग घेणे आवश्यक असते. स्वयंसेवकांनी ग्राम विकासाच्या दृष्टिकोनातून पाणी अडवून पाणी जिरवण्यासाठी गावालगत असलेल्या नाल्यावर जवळपास ४ फूट खोल व १४ ते १५ हजार लिटर पाणी साठेल असा बांध श्रमदानातून बांधला. याचा उपयोग पशू-पक्षांना तसेच कर्जाने गावच्या शेतीसाठी होईल. वन परिक्षेत्र अधिकारी श्री.संजय सोनवणे यांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला व उपक्रमाचे कौतुक केले.
या शिबिराच्या नियोजनासाठी व कृती कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डॉ. स्मिताताई संदीप पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.ए.सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.
शिबीरातील या उपक्रमाच्या आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पी. के.लभाणे, सहा.कार्यक्रमाधिकारी डॉ. पी. एन.सौदागर, श्री.बी.एच. देवरे, श्रीमती.एस.बी.पाटील व उपसरपंच श्री.प्रमोद बारेला आदींनी परिश्रम घेतले.