प्री वेडिंग शुटींग फोटोग्राफी समाज आणि संस्कृतीसाठी घातक संजय नाना वाघ

प्री वेडिंग शुटींग फोटोग्राफी समाज आणि संस्कृतीसाठी घातकच..!

“विवाह” हिंदू धर्मीयांत असलेला हा अत्यंत पवित्र संस्कार आहे! विवाहामुळे दोन व्यक्तीच नव्हे तर दोन कुटुंबे आणि त्यांचे नातेवाईक एका नात्याच्या बंधनात बांधले जातात. म्हणूनच या नात्यास लग्नगाठ म्हणतात. लग्न हे सामाजिक आणि पारंपारिक दृष्टीने हवेहवेसे वाटणारे एक पवित्र बंधन आहे.वधू वर पसंती ते मुलीची पाठवणी अशा अनेक विधिंचं कोंदण लाभलेला प्रत्येकाच्या आयुष्यात एकदाच येणारा हा अद्वितीय संस्कार!
कालानुरूप विवाह सोहळ्यात आणि विवाह पद्धतीत अनेक बदल झाले. कधीतरी जेवणाच्या पंगतींची जागा बुफेनं घेतली तर सनई-चौघडा यांची जागा ऑर्केस्ट्रा आणि डीजेनं घेतली! लग्न सोहळ्याच्या सुवर्ण आठवणी फोटोत साठवण्याऐवजी विडिओ कॅसेट आणि सिडीनं घेतली आणि आज विवाहानंतर सुरू होणाऱ्या वैवाहिक जीवनाची सुरुवात विवाहपूर्वीच करणारा एक आधुनिक पण संस्कारशील आणि संवेदनशील मनाला अंतर्मुख करायला लावणारा एक नवीन ट्रेंड,संस्कार या गोंडस नावाखाली सर्रास सुरू झालाय…प्री वेडिंग फोटो आणि व्हिडिओ शूट…!
वेडिंग प्लॅनचा एक अविभाज्य भाग म्हणजे प्री वेडिंग फोटो आणि व्हिडिओ शूट !लग्नापूर्वीच वधू-वर आपल्या कुटुंबीयांच्या संमतीने ,छायाचित्रकारांचा एक ग्रुप घेऊन ,
सुंदर लोकेशनला जाऊन फोटोशूट आणि व्हिडिओ शूट करून घेतात.विवाहाच्या नात्यात असणारी ओढ याच क्षणी काहीशी नष्ट केली जाते.मुळातच मोबाईलमुळे जरी विवाहापूर्वीच वधू-वरांमध्ये अधिक जवळीक निर्माण होत असली तरी पूर्वी विवाहापूर्वी वधू आणि वर यांच्यात विवाहापर्यंत असलेला दुरावा आणि त्या दुराव्यात असणारं कुतूहल आणि त्यातूनच पती-पत्नीच्या नात्यात निर्माण होणाऱ्या प्रेमाला काहीशी ओहटी लागली असून नाविन्याची ओढ काहीशी संपलेली दिसून येते. त्यातच प्रि वेडिंग फोटो आणि व्हिडिओ शूट यासाठी आज लाखो रुपये मध्यमवर्गीय वधू आणि वर पितादेखील खर्च करताना दिसून येतो आजच्या या बदललेल्या काळात खरंच प्री-वेडिंग फोटो आणि प्रि व्हिडिओ शूट आवश्यक आहे का याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. विवाह पद्धतीत कालानुरूप बदल होणे जरी आवश्यक असले तरी ते समाजासाठी आणि संस्कृतीसाठी तितकेच पोषक असणे आवश्यक आहे. प्री-वेडिंग च्या निमित्ताने वधू आणि वर यांच्यासमवेत जाणारा छायाचित्रकारांचा एक ग्रुप आणि त्यानिमित्ताने केले जाणारे बॉलिवूडचा प्रभाव दर्शविणारे वधू-वरांचे केले जाणारे हिडीस आणि ओंगळवाणे प्रदर्शन कोणत्याही संवेदनशील मातापित्यालाच नव्हे तर एकूणच कुटुंबाला विचार करायला भाग पाडते.
याच प्री-वेडिंग शूटिंगच्या निमित्ताने बाहेर पडलेल्या आणि एकांत लाभलेल्या वधू-वरांमध्ये मतभेद निर्माण होऊन विवाह मोडल्याच्या घटनादेखील अनेकदा वृत्तपत्रातून वाचायला मिळतात. जर या पद्धतीने विवाह होण्यापूर्वीच वधूला नाकारले जात असेल तर तिच्या भविष्याचे काय हा देखील यक्षप्रश्न निर्माण होतो. सीतेला देखील रावणाच्या बंधनातून मुक्त झाल्यानंतर अग्निपरीक्षा द्यायला लावणाऱ्या या समाजात प्री वेडिंग शूटिंग च्या निमित्ताने नाकारल्या गेलेल्या मुलींची आणि त्यांच्या कुटुंबांचे काय अवस्था होत असेल याचा गांभीर्याने विचार व्हायलाच हवा. विवाहासाठी उपस्थित असलेल्या अनेकांच्या जितक्या सकारात्मक असतील तितक्याच नकारात्मक देखील प्रतिक्रिया अनुभवायला मिळतात. आज भारतातल्या ग्रामीण भागात देखील हळूहळू प्री वेडिंग शूटिंगचे लोण पसरायला सुरुवात झाली असून वेळीच सुज्ञ पालकांसोबतच सुशिक्षित आणि समजदार वधू-वरांनीदेखील याचा विचार करायलाच हवा. ज्या गोष्टी विवाहानंतर सहजशक्य आणि समाजमान्य आहेत त्याच गोष्टी विवाहापूर्वी करून केवळ लोकांसाठी आणि मोठेपणा मिळवण्यासाठी या गोष्टी केल्या जात असतील तर निश्चितच स्वागतार्ह नाही. पती-पत्नी आणि यांच्यातली जवळीक ही अतिशय कोमल आणि नाजूक भावना असून ते केवळ त्यांच्या दोघांमधीलच आंतरिक गुपित असून ती प्रदर्शन मांडण्याची गोष्ट निश्चितच नाही. म्हणूनच यावर केला जाणारा लाखो रुपयांचा खर्च जर त्याच वधू-वरांच्या भविष्यासाठी वापरला गेला तर निश्चितच एक चांगली सुरुवात होऊ शकते. केवळ वधूवरांच्या हट्टासाठी आई-वडिलांकडून प्री वेडिंग शूटिंग आणि फोटोला परवानगी दिली जाते आणि त्यातूनच अनेकदा दोन्ही कुटुंबांना मानहानी देखील पचवावी लागते. केवळ कुटुंबाची श्रीमंती, बडेजावपणा दाखवण्यासाठी आणि उपस्थितांकडून तोंडावर स्तुतीसुमने ऐकण्यासाठी जर हा खर्च केला जात असेल तर नंतर कुस्सित टिंगल टवाळी करणारे देखील अनेक उपस्थित असतातच हे देखील लक्षात घ्यायलाच हवं..
आज प्रत्येक समाजाने या सर्व गोष्टींचा विचार करून प्री वेडिंग शूटिंग ऐवजी पोस्ट वेडिंग शूटिंग अधिक प्राधान्य देऊन आदर्श कुटुंब पद्धती राबवणाऱ्या पती-पत्नीची गोष्ट येणाऱ्या भावी पिढीसमोर उभी केल्यास ते अधिक संयुक्तिक ठरेल कारण

लग्न लग्न म्हणजे काय असतं?
प्रेमाचं ते बंधन असतं
घराचं ते घरपण असतं
विधात्यानं साकारलेलं ते एक सुंदर स्वप्न असतं…

संजय ओंकार वाघ
चेअरमन,
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था,पाचोरा