शिवरायांचे विचार आचरणात आणण्याची गरज- शिवश्री पंकज रणदिवे

शिवरायांचे विचार आचरणात आणण्याची गरज- शिवश्री पंकज रणदिवे

पाचोरा- येथील अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शिवजन्मोत्सव व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. दिनांक 21 रोजी सायंकाळी 6 ते 7 वाजे दरम्यान झालेल्या या ऑनलाईन व्याख्यानमालेला चाळीसगाव येथील शिवव्याख्याते पंकज रणदिवे यांनी “शिवराय- शिक्षण व संस्कार” या विषयावर आपले विचार व्यक्त केले. शिवरायांचे फोटो, बॅनर तसेच शिवरायांसारखा पेहराव मिरवणे महत्त्वाचे नसून शिवरायांचे संस्कार व विचार आचरणात आणण्याची गरज आहे, असे परखड मत वक्ते पंकज रणदिवे यांनी यावेळी व्यक्त केले.

शिवश्री पंकज रणदिवे यांनी
स्वराज्याच्या राजमुद्रे वरील मजकुराचे विश्लेषण करताना सांगितले की, स्वराज्य स्थापन करतानाच लोककल्याणकारी राज्य निर्मितीचा महाराजांचा उद्देश होता, हे सिद्ध होते, स्वराज्य हे सर्वांचे राज्य आहे, ही भावना लोकांमध्ये निर्माण करून मी या राज्याचा उपभोगशून्य स्वामी आहे, हे आपल्या कर्तृत्वातून छत्रपतींनी वेळोवेळी सिद्ध केले आहे.

आजच्या समाजापुढील आव्हाने वेगळी आहेत ,आमच्या समस्या आज वेगळ्या आहेत ,सद्य परिस्थितीतील युद्धाचे स्वरूप बदललेलं आहे. आता युद्धासाठी तलवार वापरायची नसून ज्ञान व पुस्तके हे युद्धाचं साधन आणि बुद्धी हे तंत्रज्ञान म्हणून वापरण्याची गरज आहे. आजच्या अराजकतेच्या वातावरणात स्वराज्यातील व्यवस्था व प्रशासनाची आवश्यकता आहे.
दक्षिण भारतातील सर्वात मातब्बर श्रीमंत आणि समृद्ध सरदार असणाऱ्या शहाजीराजांचे पुत्र असलेल्या शिवरायांच्या पायाशी सर्व सुखं लोळण घेत असताना, रयतेच दुःख पाहवले नाही म्हणून जिजाऊ आईसाहेबांच्या मार्गदर्शनाने , स्वतः दुःख व त्रास सहन करून लोकांच्या कल्याणासाठीचं राज्य निर्माण करण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगलं.

धर्माचा अहंकार व अधिनिवेष असू नये हा महाराजांच्या संस्कृतीचा एक भाग होता हे स्पष्ट करताना रणदिवे म्हणाले की, अनेक दर्गाह आणि मस्जिदिंसाठी महाराजांनी देणग्या दिलेल्या आहेत, ख्रिश्चन मिशनऱ्यांना मदत केलेली आहे. यावरून सर्व धर्मांप्रति समभाव आणि सन्मानाची भावना महाराजांमध्ये दिसून येते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करणे, घराघरांमधून मोठे फोटो लावणे, रस्त्यावरून जणू पोस्टर्सची  स्पर्धा लागली आहे. असा भास व्हावा हे सारे काही आपण करतोय, ठीक आहे. पण यासोबतच शिवरायांचे विचार आचरणात आणण्याची आणि चारित्र्यसंपन्न जीवन जगण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे असे विचार शिवश्री पंकज रणदिवे सरांनी यावेळी मांडले.

अखिल भारतीय मराठा महासंघाचे पाचोरा तालुकाध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी आभार प्रकटन केले महासंघाचे चिटणीस शिवश्री चंद्रकांत पाटील यांनी व्याख्यानाचे सूत्रसंचालन केले या व्याख्यानाला शितल अकॅडमी व टायगर किड्स चे संचालक प्रा रोहन पाटील सर यांचे तंत्र सहाय्य लाभले
दिनांक 22 फेब्रुवारी 2022 चे व्याख्यान
वेळ- सायंकाळी 6 ते 7 वाजता
विषय- युवक व रोजगाराच्या संधी
वक्ते- शिवश्री गोपाल दर्जी,जळगाव