मनपा शाळांत उत्साहात रंगला तान्हा पोळा

मनपा शाळांत उत्साहात रंगला तान्हा पोळा

चंद्रपूर ३१ ऑगस्ट – चंद्रपूर महानगरपालिका अंतर्गत शाळांमध्ये तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. विविध वेशभुषेत आपल्या पालकांसोबत आलेल्या बालगोपाळांनी आपल्या नंदीला सजविण्यात बरीच मेहनत घेतल्याचे दिसत होते.
रंगरंगोटी करून सजविलेले लाकडी बैल, अर्ध्या फुटापासून ते तीन फुटापर्यंतचे डौलदार आकर्षक बैल, यात कुणी बैलासह लावलेला सामाजिक संदेश, सजलेले बैल अन् नटलेले चिमुकले, खाऊची धम्माल, मुलांनी केलेली विविध वेशभूषा यामुळे शहीद भगतसिंग प्राथमिक शाळा व मनपा सावित्रीबाई फुले शाळेच्या विद्यार्थ्यांनी धमाल केली.
पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तान्हा पोळा या दिवशी लहान मुले लाकडी बैलांचा पोळा साजरा करतात. बळीराजाचा खरा सखा हा बैलच आहे,लहान मुलांना बैलाचे महत्व कळावे म्हणून लाकडी बैल पोळ्याची सुरूवात केली गेली. तान्हा पोळ्यास नंदी घेऊन शाळेत आलेल्या सर्व मुलांचे शिक्षकांनी स्वागत केले. याप्रसंगी मुलांसाठी विविध स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या होत्या तसेच खाऊचे वाटप करण्यात आले.