Home पाचोरा तालुका रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला कोळगावच्या गोपीचंद पुना पाटील विद्यालयात ‘सजीव राखी’चा अनोखा उपक्रम….!!!!

रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला कोळगावच्या गोपीचंद पुना पाटील विद्यालयात ‘सजीव राखी’चा अनोखा उपक्रम….!!!!

रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला कोळगावच्या गोपीचंद पुना पाटील विद्यालयात ‘सजीव राखी’चा अनोखा उपक्रम….!!!!

४० विद्यार्थ्यांना मिळाली बहिणीची माया; २५ विद्यार्थिनींनी मानले विद्यार्थ्यांना भाऊ

 

 

 

 

कोळगाव, ता. भडगाव (प्रतिनिधी) : येथील गोपीचंद पुना पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक राख्या तयार करून पारंपरिक रक्षाबंधनाचा सण उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात साजरा केला.यावेळी ‘सजीव राखी’च्या माध्यमातून भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आणि परस्पर सहकार्याचा संदेश देण्यात आला.

 

विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या पर्यावरणपूरक राख्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता,पर्यावरण संवर्धनाची जाणीव तसेच भारतीय संस्कृती व परंपरांविषयी आदर निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री.आर.आर.वळखंडे होते. विद्यार्थीनींनी त्यांनाही राखी बांधून सण साजरा केला,त्यानंतर रक्षाबंधनाचे महत्त्व विशद करताना सांगितले की,भाऊ-बहिणीचे नाते हे प्रेम,विश्वास,जिव्हाळा आणि परस्पर संरक्षणाचे प्रतीक आहे. विद्यालयातील ज्या सुमारे ४० विद्यार्थ्यांना सख्ख्या बहिणी नाहीत,अशा विद्यार्थ्यांना विद्यालयातील बहिणींनी राखी बांधून बहिणीच्या प्रेमाची उणीव भरून काढली.तसेच ज्या २५ विद्यार्थिनींना भाऊ नाही,त्यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना भाऊ मानून त्यांच्याकडून राखी बांधून घेतली.त्यामुळे या उपक्रमाला सामाजिक आणि भावनिक स्वरूप प्राप्त झाले.

 

यावेळी विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाची परंपरा,त्यामागील सांस्कृतिक व भावनिक महत्त्व तसेच रक्षाबंधनाची विधीवत पद्धत याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली.आई-वडिलांनंतर रक्ताच्या नात्यात भाऊ-बहिणीचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे असते.त्यामुळे प्रत्येक भावाने आपल्या बहिणीचा प्रेमाने आदर व सन्मान करावा, तिच्या सुख-दुःखात साथ द्यावी आणि संकटाच्या काळात तिच्या मदतीला धावून जावे,असा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.

 

रक्षाबंधनाच्या माध्यमातून केवळ राखी बांधण्याची परंपरा न जोपासता बंधुभाव, सामाजिक सलोखा, परस्पर सन्मान आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमाची शोभा वाढवली.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री.एस.ए.वाघ यांनी केले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विद्यालयातील महिला शिक्षिका श्रीमती सरिता पाटील,श्रीमती चारुलता पाटील व श्रीमती तृप्ती भामरे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला.

 

रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, ‘सजीव राखी’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी माणुसकीच्या नात्याची वीण अधिक घट्ट केली, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Don`t copy text!