फसवणुकीच्या डिजिटल जाळ्यापासून सुरक्षिततेकडे वाटचाल; कासोद्यात महिलांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती सत्र, ऑनलाइन व्यवहाराबाबत दिला सतर्कतेचा संदेश

कासोदा, ता. एरंडोल, जि. जळगाव | दि. २६ ऑगस्ट २०२६
कासोदा येथे महिलांमध्ये सायबर सुरक्षा आणि डिजिटल व्यवहारांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष सायबर सुरक्षा जनजागृती सत्र घेण्यात आले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव – School of Computer Science विभागातील विद्यार्थिनी दर्शना चौधरी व टीना पाटील यांनी Quick Heal Foundation यांच्या मार्गदर्शनाखाली हे सत्र घेतले.
डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर लक्षात घेता, ऑनलाइन फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत महिलांना सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यात आले. सत्रामध्ये KYC Fraud, OTP Fraud, Link Fraud, Strong Password, 2FA (Two-Factor Authentication), Photo Morphing, Digital Footprint आणि Fake Job Offers या महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला.
सायबर गुन्हेगारांकडून बनावट KYC अपडेटच्या नावाखाली होणारी फसवणूक, OTP मागून केली जाणारी आर्थिक फसवणूक, संशयास्पद लिंक पाठवून होणारे फ्रॉड तसेच बनावट ऑनलाइन नोकरीच्या ऑफर्स याबाबत उदाहरणांसह माहिती देण्यात आली. सोशल मीडियावरील फोटोचा गैरवापर आणि Photo Morphing पासून सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक काळजी घेण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच ऑनलाइन खात्यांसाठी मजबूत पासवर्ड वापरणे, 2FA सुरू ठेवणे, डिजिटल फूटप्रिंटबाबत जागरूक राहणे आणि अनोळखी व्यक्ती किंवा संशयास्पद वेबसाइटला वैयक्तिक माहिती न देणे याबाबत सूचना देण्यात आल्या.
सायबर फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी OTP, UPI PIN, पासवर्ड किंवा इतर गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये, संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये आणि कोणताही ऑनलाइन व्यवहार करण्यापूर्वी त्याची खात्री करून घ्यावी, असा महत्त्वपूर्ण संदेश महिलांना देण्यात आला.
उपस्थित महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सायबर सुरक्षेशी संबंधित विविध प्रश्न विचारले. महिलांनी डिजिटल व्यवहार करताना अधिक सतर्क आणि सुरक्षित राहण्याचा संकल्प केला.
डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा वापर जितका वाढत आहे, तितकीच सायबर सुरक्षेबाबत जागरूकता आवश्यक आहे. महिलांना सुरक्षित डिजिटल व्यवहारासाठी सक्षम करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
























