ज्येष्ठ नागरीकांच्या मदतीसाठी आता हेल्पलाईन सामाजिक न्याय विभाग व जनसेवा फाऊंडेशनचा संयुक्त उपक्रम 14567 हा टोल फ्री क्रमांक

ज्येष्ठ नागरीकांच्या मदतीसाठी आता हेल्पलाईन
सामाजिक न्याय विभाग व जनसेवा फाऊंडेशनचा संयुक्त उपक्रम
14567 हा टोल फ्री क्रमांक

जळगाव, दि. 30 – ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन लवकरच सुरु होणार असून या हेल्पलाईनचा क्रमांक 14567 असा राहणार असून ही राष्ट्रीय हेल्पलाईन असणार आहे. सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकारमार्फत देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी सर्व राज्यात हेल्पलाईन सुरु करण्यात येत आहे. राज्य शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, जनसेवा फाउंडेशन पुणे व राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यामध्ये ज्येष्ठांसाठी ही राष्ट्रीय हेल्पलाईन चालविली जाणार आहे.
या हेल्पलाईनचा उद्देश हा ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करणे हा राहणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे, अत्याचारग्रस्त वृध्द व्यक्तींची काळजी घेण्यासाठी व इतर सेवांसाठी वेळोवेळी हेल्पलाईनचा उपयोग होणार आहे. हेल्पलाईनचा टोल फ्री क्रमांक 14567 हा असून हेल्पलाईन ची ही वेळ सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत असणार आहे. हेल्पलाईन केवळ 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर व 1 मे हे दिवस वगळता वर्षातील सर्व दिवशी सुरु राहणार आहे. हेल्पलाईनमार्फत आरोग्य जागरुकता, निदान, उपचार, निवारा, घरे, डे केअर सेंटर, पोषण विषयक, ज्येष्ठांसंबंधी अनुकूल उत्पादने, सांस्कृतिक, अध्यात्मिक, कला व करमणूक माहिती दिली जाणार आहे. तसेच कायदेविषयक मार्गदर्शन, विवाद निराकारण, पेन्शन संबंधित मार्गदर्शन व योजनांची माहितीही दिली जाणार आहे. तसेच चिंता निराकरण, नातेसंबंध व जीवन व्यवस्थापन, मृत्यूशी संबंधीत शोक, वेळ, ताणतणाव, राग व्यवस्थापन, मृत्युपूर्वीचे दस्तऐवजीकरण आदी मार्गदर्शनही केले जाणार आहे.
या हेल्पलाईनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्हास्तरावर क्षेत्रीय प्रतिनिधी नियुक्त केले आहे. या हेल्पलाईन बाबत जनसेवा फाउंडेशनच्या मीनाक्षी कोळी यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेऊन त्यांना याबाबत अवगत केले आहे. ज्येष्ठ नागरीकांच्या मदतीसाठी या हेल्पलाईन ची माहिती जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरीकांना होण्यासाठी इतरांनी त्यांना अवगत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी केले आहे.