ए.टी.डी. द्वितीय वर्षात कु.भूमी मनोज पाटील राज्यातून प्रथम ‘माँ से बेटी सवाई’ उपक्रमांतर्गत लिनेस क्लब पाचोरा तर्फे सत्कार
बालपणापासूनच चित्रकलेची आवड जोपासत, वडिलांकडून मिळालेल्या कलेच्या वारसाला मेहनत, जिद्द आणि चिकाटीची जोड देत कु. भूमी मनोज पाटील हिने ए.टी.डी. द्वितीय वर्षाच्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत असून, तिच्या यशाचा गौरव म्हणून लिनेस क्लब ऑफ पाचोरातर्फे ‘माँ से बेटी सवाई’ या उपक्रमांतर्गत तिचा सत्कार करण्यात आला.
भूमीचे माध्यमिक शिक्षण श्री. गो से हायस्कूल, पाचोरा येथे पूर्ण झाले. शालेय जीवनापासूनच तिच्या अंगी असलेली चित्रकलेची आवड आणि कलागुण तिने जोपासले. विशेष म्हणजे, लिनेस क्लब ऑफ पाचोराच्या अध्यक्षा प्रा. सौ. जयश्रीताई वाघ यांच्या फिनिक्स अकॅडमीची भूमी विद्यार्थिनी होती. विद्यार्थीदशेपासूनच तिला प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.
भूमीला चित्रकलेचा वारसा तिचे वडील पेंटर मनोज पाटील यांच्याकडून मिळाला. तिचे वडील साईन बोर्ड पेंटर असल्याने बालपणापासूनच ती त्यांची पेंटिंगची कला जवळून पाहत होती. सुरुवातीला कार्टून व स्केच काढण्यापासून तिच्या चित्रकलेच्या प्रवासाला सुरुवात झाली. मुलीतील कलागुण ओळखून तिचे वडील तिच्या चित्रकलेकडे विशेष लक्ष देऊ लागले आणि वेळोवेळी तिला मार्गदर्शन करू लागले.
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसतानाही तिच्या वडिलांनी तिच्या कलेला कधीही अडथळा येऊ दिला नाही. आवश्यक चित्रकला साहित्य उपलब्ध करून देत त्यांनी तिला सातत्याने प्रोत्साहन दिले. प्राथमिक शालेय जीवनापासूनच भूमीने तालुकास्तरीय तसेच विविध चित्रकला स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. अनेक स्पर्धांमध्ये तिने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवत आपल्या कलेची छाप उमटवली.
घरातील कामे सांभाळूनही भूमीने स्केचिंग, रंगकाम आणि चित्रकलेचा नियमित सराव सुरू ठेवला. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तिने फाईन आर्ट्स, मुंबई येथे शिक्षण घेण्याची इच्छा वडिलांकडे व्यक्त केली. वडिलांनी तिच्या इच्छेला पाठिंबा देत सीईटी परीक्षेच्या तयारीसाठी प्रोत्साहन दिले. भूमीने कठोर सराव करून सीईटी परीक्षा दिली आणि तिची चित्रकलेच्या अभ्यासक्रमासाठी निवड झाली.
त्यानंतर तिने सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे एक वर्षे शिक्षण घेतले. मात्र दुसऱ्या वर्षी लेडीज हॉस्टेलची योग्य व्यवस्था उपलब्ध न झाल्यामुळे तिला हे शिक्षण दुसऱ्या वर्षी अपूर्ण सोडावे लागले. त्यामुळे ती काही काळ निराश झाली. मात्र तिच्या वडिलांनी तिला खंबीरपणे आधार देत “पेंटिंग कधीही बंद करू नकोस, तुझ्यात कला आहे” असा आत्मविश्वास दिला.
वडिलांच्या प्रेरणेतून भूमीने स्व. अनिलदादा देशमुख चित्रकला महाविद्यालयात ए.टी.डी. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. संदीप पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले. भूमीने नियमित शिक्षण घेत अथक सराव सुरू ठेवला आणि अखेर तिच्या मेहनतीला यश मिळाले.
२०२५-२६ या शैक्षणिक वर्षात ए.टी.डी. द्वितीय वर्षाच्या परीक्षेत भूमीने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. तिच्या या यशामुळे कुटुंबीय, शिक्षक, महाविद्यालय आणि पाचोरा परिसराचा गौरव झाला आहे.
भूमीचे पुढील ध्येय जी.डी. आर्टचे शिक्षण पूर्ण करून चित्रकलेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याचे आहे. प्रतिकूल परिस्थितीतही स्वप्नांचा पाठलाग करून यश संपादन करणाऱ्या भूमीची यशोगाथा अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
तिच्या या उल्लेखनीय यशाचा गौरव करण्यासाठी लिनेस क्लब ऑफ पाचोरातर्फे ‘माँ से बेटी सवाई’ या उपक्रमांतर्गत भूमीचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार अध्यक्षा प्रा. सौ. जयश्रीताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली, लिनेस क्लबच्या ज्येष्ठ संचालिका ॲड. प्रा. सौ. वैशालीताई बोरकर,ज्येष्ठ संचालिका सौ रूपालीताई पाटील,सचिव सौ. सरलाताई पाटील, कोषाध्यक्ष सौ. प्रियाजी लाहोटी, PRO व सहसचिव कु. चेतना रणदीप हिरे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी कु.नेहा न्यानेश्वर पाटील आणि कु.साक्षी दादाराव शेळके उपस्थित होते
भूमीच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून, तिच्या पुढील कलाप्रवासासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.























