Home महाराष्ट्र तळणीच्या विशाल सोनवणे ला ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज गौरव पुरस्कार’ प्रदान

तळणीच्या विशाल सोनवणे ला ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज गौरव पुरस्कार’ प्रदान

तळणी च्या विशाल सोनवणे ला ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज गौरव पुरस्कार’ प्रदान

 

पेंडगाव (प्रतिनिधी) :

सिल्लोड तालुक्यातील तळणी येथील शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक व पत्रकार श्री. विश्वंभर (विशाल) दत्तू सोनवणे यांना त्यांच्या शिक्षण, डिजिटल कौशल्य प्रशिक्षण, समाजकार्य व पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

 

हा पुरस्कार दिनांक 14 जानेवारी २०२६ रोजी नाशिक (सिन्नर) येथील अण्णाभाऊ साठे नाट्यमंदिरात आयोजित भव्य समारंभात प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम संजीवनी फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. पुरस्कार वितरणाचा मा. ना. बच्चुभाऊ कडू (मा.राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य), मा. ना. रविकांतदादा तुपकर (मा.राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) तसेच मा. श्री. विवेकभैया कोल्हे (चेअरमन, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सह. सा. का. लि., कोपरगाव) यांच्या शुभहस्ते पार पडला.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. खा. भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी लोकसभा मतदारसंघ) हे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री रघुवीर खेडकर (लोककलावंत), मा. सौ. उत्कर्षाताई रुपवते (सदस्या, राज्य महिला आयोग, महाराष्ट्र राज्य), मा. संग्रामभैया शेवाळे (सदस्य, युवा धोरण समिती, महाराष्ट्र शासन), मा. उदयभाऊ सांगळे (सदस्य, जिल्हा परिषद, नाशिक), मा. हरीशभाऊ गीते साहेब (सहसचिव, मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र शासन), मा. विकासदादा नवाळे (उपायुक्त, संभाजीनगर महानगरपालिका), आदी मान्यवर उपस्थित होते.

 

तळणीसारख्या ग्रामीण भागातील अत्यंत सामान्य व प्रतिकूल परिस्थितीतून आलेल्या विश्वंभर सोनवणे यांनी शिक्षणासाठी मोलमजुरी करत आपला जीवनप्रवास सुरू केला. आई-वडिलांचे संस्कार, वारकरी संप्रदायातील शिकवण आणि स्वतःची जिद्द यांच्या जोरावर त्यांनी शिक्षण, तंत्रज्ञान व समाजसेवेच्या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

 

“ग्रामीण भागातील युवकांनाही संगणक व आधुनिक तंत्रज्ञानाची समान संधी मिळावी” या उद्देशाने त्यांनी सद्गुरू कॉम्प्युटर्स, तळणी/जळगाव तसेच विशाल मल्टी सर्व्हिसेस या संस्थांच्या माध्यमातून MS-CIT, Tally, Digital Marketing, AI यांसारखे शासनमान्य रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू केले. मागील काही वर्षांत त्यांच्या प्रशिक्षण केंद्रातून शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष नोकरी मिळाल्याचे उल्लेखनीय कार्य त्यांनी केले आहे.

 

पत्रकारितेच्या क्षेत्रात ते एक उत्कृष्ट मुलाखतकार म्हणून ओळखले जात असून, शेतकरी प्रश्न, शिक्षण व सामाजिक विषयांवर ते सातत्याने लोकाभिमुख वृत्तांकन करत आहेत. सध्या ते विवेचन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून YCMOU, MSSDS व NSDC अंतर्गत तळणी येथे मोठ्या कौशल्य प्रशिक्षण केंद्राच्या उभारणीसाठी कार्यरत आहेत.

 

पुरस्कार स्वीकारताना बोलताना विश्वंभर सोनवणे म्हणाले,

“हा पुरस्कार माझ्या कार्याचा सन्मान तर आहेच, पण समाजासाठी अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणाही आहे. माझ्या आयुष्याच्या प्रवासात आई-वडिलांचे मार्गदर्शन, वारकरी संप्रदायाची शिकवण, विद्यार्थी पालक यांचा विश्वास व सहकाऱ्यांचा पाठिंबा यामुळेच हे यश शक्य झाले.”

 

यापूर्वीही त्यांना सावित्री ज्योती राज्यस्तरीय पुरस्कार, गुणीजन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार, MKCL दर्जेदारी प्रशिक्षण संस्था पुरस्कार तसेच संत गाडगेबाबा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले असून, या नव्या सन्मानामुळे त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याला अधिक बळ मिळाले आहे. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. ज्ञानेश्वर वसंतराव सानप (चेअरमन, संजीवनी फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

Don`t copy text!