सोयगाव : जि. प., पं. स. निवडणूक अर्जांची छाननी दोन अर्ज अवैध; आमखेडा गटातील आक्षेप फेटाळला

सोयगाव : जि. प., पं. स. निवडणूक अर्जांची छाननी दोन अर्ज अवैध; आमखेडा गटातील आक्षेप फेटाळला

 

 

 

 

सोयगाव :

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी गुरुवारी (दि. २२) निवडणूक निर्णय अधिकारी रुपेश सिंगारे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा मेने यांच्या उपस्थितीत पार पडली. या छाननीत गोंदेगाव गटातील दोन अपक्ष उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले.

गोंदेगाव गटातील उमेदवार लक्ष्मीबाई जंगू जाधव यांनी नामनिर्देशन पत्रातील शपथ घेतलेली नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. तर दुसऱ्या अपक्ष उमेदवार सरलाबाई सुनील तातळे यांनी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र व हमीपत्र सादर न केल्यामुळे त्यांचाही अर्ज अवैध घोषित करण्यात आला, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रुपेश सिंगारे यांनी दिली.

दरम्यान, आमखेडा गटात भाजपच्या उमेदवार पुष्पा काळे यांच्या उमेदवारी अर्जावर शिंदेसेनेच्या उमेदवार मोनाली अनिल पवार यांनी आक्षेप नोंदविला. पुष्पा काळे यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप करण्यात आला होता. या आक्षेपामुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सदर अतिक्रमणाचा विषय हा न्यायालयाच्या अखत्यारीतील असून निवडणूक विभागाशी संबंधित नसल्याचे स्पष्ट करत निवडणूक निर्णय अधिकारी रुपेश सिंगारे यांनी हा आक्षेप फेटाळून लावत पुष्पा काळे यांचा अर्ज वैध ठरविला.

या घटनेनंतर संभाव्य तणाव लक्षात घेता प्रशासनाने तत्काळ पोलिस बंदोबस्त वाढविला. छाननी प्रक्रियेत तीन गटांतील १७ तर सहा गणांतील ३७ उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत.

चौकट :

आमखेडा गटात तणाव

आमखेडा गटातील उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतल्याने तहसील परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वेळीच निर्णय घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

 

पत्रकारांना रोखल्याचा आरोप

छाननीनंतर आमखेडा गटातील आक्षेपाच्या वेळी स्थानिक माध्यमांच्या पत्रकारांना वृत्त संकलनापासून रोखण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. पत्रकारांना बाहेर काढण्यात आल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत घटनेचा निषेध नोंदविला. मात्र, याचवेळी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना सन्मानाने बसविण्यात आल्याचेही निदर्शनास आले.