खा. कल्याण काळेंच्या उपस्थितीत सोयगाव तहसील कार्यालयात आढावा बैठक; ग्रामस्थांचा तक्रारींचा पाढा, शासकीय कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप

खा. कल्याण काळेंच्या उपस्थितीत सोयगाव तहसील कार्यालयात आढावा बैठक; ग्रामस्थांचा तक्रारींचा पाढा, शासकीय कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप

 

सोयगाव | प्रतिनिधी – दत्तात्रय काटोले

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या अध्यक्षतेखाली सोयगाव तहसील कार्यालयात गुरुवारी तालुका स्तरीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण भागातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत तक्रारींचा अक्षरशः पाढा वाचला.

 

या बैठकीत ग्रामस्थांनी सांगितले की, अनेक शासकीय अधिकारी मुख्यालयी अनुपस्थित राहतात आणि जिल्हा मुख्यालयातूनच ये-जा करतात. कार्यालयात उशिरा येणे आणि दुपारच्या सुमारास लवकर निघणे हे नेहमीचेच झाले आहे. परिणामी, अतिवृष्टीच्या कालावधीत शेतकऱ्यांची महत्त्वाची कामे खोळंबली आहेत.

 

ग्रामपंचायतींतून प्राप्त झालेल्या तक्रारींमध्ये घरकुल, गाय गोठा, सिंचन विहीर योजना, पांदन रस्ते, बैलगाडी वाट, सार्वजनिक रस्ते, पूल, पिण्याचे पाणी आणि एस.टी. बस सेवेची दुरवस्था यांचा समावेश होता.

 

विशेष बाब:

आजवर तहसील कार्यालयात विविध मोर्चे आणि निवेदने देण्यात आली, परंतु तहसीलदार कधीच दिसल्या नाहीत. मात्र खासदार साहेबांच्या आगमनामुळे तहसीलदार मनीषा मेणे-जोगदंड यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. यावरून तालुक्यातील शेतकरी वर्गात आश्चर्य व्यक्त केले जात असून, बैठकीनंतर या विषयावरही चर्चेला उधाण आले.

 

खा. काळेंचा शासनावर हल्लाबोल

“राज्य सरकारने शेतकऱ्यांना केवळ दिखाऊ मदत जाहीर केली आहे. खरंतर संपूर्ण कर्जमाफीची गरज होती, पण सरकारने अतीअल्प मदतीद्वारे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत,” अशी तीव्र प्रतिक्रिया खासदार डॉ. कल्याण काळे यांनी बैठकीदरम्यान दिली.

 

उपस्थित मान्यवर:

या बैठकीस तालुका काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र काळे, शिवसेना (उबाठा) तालुका प्रमुख दिलीप मचे, राष्ट्रवादी (शरद पवार) तालुका अध्यक्ष इंद्रसिंह सोळुंके, शहर काँग्रेस अध्यक्ष दिनेशासिंह हजारी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष रवींद्र काळे, कृष्णा जूनघरे पाटील, लखुसिंग नाईक, प्रमोद रावणे, भारत पगारे आणि डॉ. रघुनाथ फुसे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

 

सोयगाव – तहसील कार्यालयात पार पडलेल्या तालुका स्तरीय आढावा बैठकीत ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकताना खासदार डॉ. कल्याण काळे, तहसीलदार मनीषा मेणे-जोगदंड व अन्य अधिकारी.