जालना जिल्ह्यातील स्टील उद्योगांमुळे वाढते प्रदूषण — नागरिकांमध्ये चिंता

जालना जिल्ह्यातील स्टील उद्योगांमुळे वाढते प्रदूषण — नागरिकांमध्ये चिंता

 

जालना (श्री महेंद्र बेराड तालुका प्रतिनिधी): औद्योगिक प्रगतीच्या नावाखाली वाढत चाललेले प्रदूषण हा जालना जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका बनला आहे. MIDC जालना परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर स्टील उद्योग उभे राहिले असून या उद्योगांमुळे हवेतील, पाण्यातील आणि आवाजातील प्रदूषणात झपाट्याने वाढ होत आहे.

 

स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, अनेक स्टील कारखाने दिवस-रात्र चालू असतात. त्यातून बाहेर पडणारा दाट काळा धूर आणि धुळीचे ढग दूरवर पसरतात. परिणामी परिसरातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. श्वसनाचे विकार, डोळ्यांचे त्रास, त्वचारोग आणि अ‍ॅलर्जी यासारख्या आजारांचे प्रमाण वाढल्याचे स्थानिक डॉक्टरांनीही निदर्शनास आणून दिले आहे.

 

तज्ज्ञांच्या मते, या कारखान्यांमधून उत्सर्जित होणारे सूक्ष्म धुळकण आणि रासायनिक घटक हे मानवी आरोग्यासाठी घातक असून दीर्घकाळाच्या संपर्कामुळे फुफ्फुसांचे आजार आणि इतर गंभीर विकार उद्भवू शकतात. याशिवाय, कारखान्यांमधून बाहेर पडणारे सांडपाणी जवळच्या विहिरी आणि नाल्यांमध्ये मिसळत असल्याने भूजल दूषित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

परिसरातील शेतकऱ्यांनीही चिंता व्यक्त केली आहे. “पूर्वी शेतीतील उत्पादन समाधानकारक होतं, पण आता धुळीमुळे पिकांच्या पानांवर थर जमा होतो, झाडांची वाढ खुंटते आणि उत्पादन घटते,” असे एका शेतकऱ्याने सांगितले.

 

या गंभीर परिस्थितीची दखल घेत पर्यावरण विभागाने काही प्राथमिक तपासण्या सुरू केल्या आहेत. मात्र नागरिकांचा आरोप आहे की तपासणी केवळ कागदावरच मर्यादित राहते. स्थानिक पातळीवर प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस पावले उचलली गेली नाहीत तर भविष्यात गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

 

पर्यावरण प्रेमी आणि सामाजिक संघटनांनी प्रशासनाकडे खालील मागण्या केल्या आहेत:

 

प्रदूषण नियंत्रणासाठी कारखान्यांवर कठोर कारवाई करावी,

 

फिल्टर, स्क्रबर यंत्रणा बसवणे बंधनकारक करावे,

 

रात्री चालणाऱ्या कारखान्यांवर नियंत्रण आणावे,

 

नागरिकांना हवेच्या गुणवत्तेची माहिती नियमितपणे द्यावी.

 

 

औद्योगिक प्रगती ही समाजासाठी महत्त्वाची असली तरी ती पर्यावरणाच्या किमतीवर होऊ नये, असे नागरिकांचे मत आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास जालना जिल्ह्याचे आरोग्य व पर्यावरण धोक्यात येईल, त्यामुळे प्रशासनाने यावर योग्य ती उपाययोजना त्वरित करावी अशी मागणी श्री महेंद्र बेराड लोक संघर्ष पक्षाचे तालुका अध्यक्ष आणि स्थानिक जनतेने दिला आहे.