मोरपंखी रंगात नटलेली निसर्गाची किमया; नवरात्रीच्या आठव्या दिवशी इंद्रधनुष्याचे अद्भुत दर्शन

मोरपंखी रंगात नटलेली निसर्गाची किमया; नवरात्रीच्या आठव्या दिवशी इंद्रधनुष्याचे अद्भुत दर्शन

 

दत्तात्रय काटोले/सोयगाव

 

सोयगाव (प्रतिनिधी) – नवरात्र उत्सवाच्या आठव्या दिवशी, सोयगाव परिसरात निसर्गाने एक आगळीवेगळी भेट दिली. आज संध्याकाळच्या सुमारास अचानक पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आणि आकाशात एक देखणं इंद्रधनुष्य उमटलं. विशेष म्हणजे, आजचा नवरात्रीचा रंग – मोरपंखी – हा इंद्रधनुष्याच्या रंगांमध्ये प्रकर्षाने जाणवला, ज्यामुळे हा अनुभव अधिकच भक्तिमय झाला.

या दिवशी माँ कालरात्रिची उपासना केली जाते. अनेक माता-भगिनी उपवास करत असतात. अशा भक्तजनांना आज निसर्गाच्या या अद्भुत दृश्याचं दर्शन घडल्याने मनोमन आनंद झाला. बऱ्याच दिवसांनंतर सोयगाव परिसरात इंद्रधनुष्य दिसल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले.

इंद्रधनुष्य हे सात रंगांचे प्रतीक असून, ते अनेक वेळा अध्यात्मिक संकेत मानले जाते. आज नवरात्रीचा आठवा दिवस आणि मोरपंखी रंगाचे महत्व लक्षात घेता, या रंगाचा इंद्रधनुष्यात दिसणं हे भक्तांसाठी एक प्रकारचे दैवी संकेत मानले गेले.

या घटनेनंतर अनेकांनी फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत निसर्गाच्या या अद्वितीय कलेचे कौतुक केले.

नवरात्र महोत्सव आणि निसर्ग यांची ही अनोखी सांगड आजच्या दिवसाचे खास आकर्षण ठरली.