“तिरंग्याच्या साक्षीने निर्मल इंटरनॅशनल स्कूलचा स्वातंत्र्य सोहळा देशभक्तीच्या लहरींनी दुमदुमला”..!
पाचोरा – देशभक्तीच्या साक्षीने, देशप्रेमाच्या तेजोमय वातावरणात, निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात ७९ वा स्वातंत्र्य दिन अतुलनीय उत्साहात जल्लोषात साजरा करण्यात आला. सकाळी ७:३० वा.संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय सौ. वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. तत्पूर्वी शाळेचे प्राचार्य श्री. गणेश राजपूत यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व आणि स्वातंत्र्याच्या किमतीची जाण उपस्थितांना भावपूर्ण शब्दांत करून दिली.
विद्यार्थ्यांच्या हृदयात उसळलेल्या देशभक्तीच्या लाटेला पथसंचलनाची जोड मिळाली. इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत देखणे व शिस्तबद्ध पथसंचलन सादर करून उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली. त्यानंतर रंगला “ऑपरेशन सिंदूर” या विषयावर आधारित सांस्कृतिक महोत्सव.ज्यात देशप्रेम, त्याग आणि कर्तव्यनिष्ठेचे विविध पैलू कलात्मकतेतून उजागर झाले. विद्यार्थ्यांनी समूहगायन, समूहनृत्य, प्रभावी भाषणे आणि नाट्य प्रयोगांद्वारे रसिकांच्या मनात देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित केली.
आपल्या मनोगतात सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी कार्यक्रमात सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करताना सांगितले की, “समृद्ध भारताची पायाभरणी आजच्या विद्यार्थ्यांच्या चारित्र्य, जिद्द, मेहनत आणि जबाबदारीत दडलेली आहे. पैशाचा नव्हे, तर मूल्यांचा गौरव करण्याची वेळ आली आहे” अशा प्रेरणादायी शब्दांनी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कवायत व संचलन कार्यक्रमाचे निरीक्षण करण्यासाठी जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख श्री.ज्ञानेश्वर पाचोळे यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी शाळेचे सचिव श्री. नरेंद्रसिंग सुर्यवंशी, जनसंपर्क अधिकारी श्री. आय. बी. सिंग, उपप्राचार्य श्री. प्रदिप सोनवणे, समन्वयक सौ. स्नेहल पाटील यांसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने अथक परिश्रम घेतले.