‘संविधान जागृती ही काळाची गरज आहे’ श्री. गोपालराव सोनवणे

‘संविधान जागृती ही काळाची गरज आहे’ श्री. गोपालराव सोनवणे

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य विद्यालयातील राज्यशास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन व संशोधन केंद्र तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संविधान दिवसानिमित्त श्री.गोपालराव सोनवणे (माजी उपसभापती, पंचायत समिती, चोपडा) यांचे ‘भारतीय संविधान व सद्य:स्थिती’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच संविधान पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी उपप्राचार्य व डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्ययन व संशोधन केंद्राचे समन्वयक श्री.एन.एस.कोल्हे, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, मार्गदर्शक श्री.गोपालराव सोनवणे, श्री.डी.डी.कर्दपवार, रजिस्ट्रार श्री.डी. एम.पाटील, श्री.एस.बी.पाटील आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख श्री.डी.डी.कर्दपवार यांनी केले. यावेळी संविधान उद्देश पत्रिकेचे वाचन श्री.बी.एच.देवरे यांनी केले.
यावेळी भारतीय संविधान व सद्यस्थिती’ या विषयावर मार्गदर्शन करतांना श्री.गोपालराव सोनवणे म्हणाले की, संविधान जागृती करणे ही काळाची गरज आहे. शिक्षण हे जगण्याचे व परिवर्तन घडविण्याचे साधन असून वैचारिक लढाई परिवर्तनशील असते. आजच्या पिढीने वैचारिक वारसा टिकवून ठेवणे गरजेचे आहे. अवांतर वाचन व शिक्षणाने बौद्धिक विकास होतो. प्रत्येक व्यक्तीने संविधान वाचन करून त्याचा अवलंब करावा तसेच समाज जागृती करावी.
याप्रसंगी श्री.एस.बी.पाटील आपले विचार व्यक्त करतांना म्हणाले की, ‘राज्यघटना सर्व जाती-धर्माच्या लोकांना जोडते. म्हणून संविधानाचे वाचन करुन ती समजून घेणे काळाची गरज आहे’.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी म्हणाले की, संविधानातील हक्क व कर्तव्ये समजून घेऊन त्याचा अवलंब केल्यास सामाजिक स्वास्थ टिकवून ठेवण्यासाठी मदत होईल. आज प्रत्येक नागरिकाने वैचारिक मंथन करणे आवश्यक आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.एस.बी. पाटील यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी श्री.व्ही.पी. हौसे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.एम.एल.भुसारे, श्री.एस.जी.पाटील व श्री.बी.एच.देवरे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.