टीएएसमधील विद्यार्थ्यांनी घेतली कर्तव्यनिष्ठेची शपथ- आत्मविश्वास, समर्पण आणि शाळेच्या मूल्यांची दिली ग्वाही

टीएएसमधील विद्यार्थ्यांनी घेतली कर्तव्यनिष्ठेची शपथ- आत्मविश्वास, समर्पण आणि शाळेच्या मूल्यांची दिली ग्वाही

 

प्रतिनिधी,

 

पुणे येथील द ॲकॅडमी स्कूल (टीएएस) मध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठीच्या इन्व्हेस्टिचर सेरेमनीचा (Investiture Ceremony) एक प्रेरणादायी सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विद्यार्थी परिषदेच्या १२ विद्यार्थ्यांची अधिकृतपणे प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांना विश्वास आणि जबाबदारीचे प्रतीक म्हणून आकर्षक बिल्ले (बॅजेस) आणि सॅश देऊन सन्मानित करण्यात आले.

 

या महत्त्वपूर्ण सोहळ्यात हेड बॉय, हेड गर्ल, असिस्टंट हेड बॉय, असिस्टंट हेड गर्ल, तसेच स्पोर्ट्स, कल्चरल आणि हाऊस कॅप्टन्स यांसारख्या विविध पदांवर निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तव्याची आणि निष्ठेची शपथ घेतली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांप्रती आणि शिक्षकांप्रती समर्पण आणि वचनबद्धतेची ग्वाही दिली. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना आत्मविश्वासू, जबाबदार आणि भविष्यातील सक्षम नेते म्हणून घडवण्याच्या टीएएसच्या कटिबद्धतेचा एक उत्कृष्ट नमुना ठरला.

 

कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उत्साही स्वागत गीताने झाली ज्यामुळे संपूर्ण वातावरणात चैतन्य निर्माण झाले. या कार्यक्रमला शाळेच्या मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापिका, समन्वयक आणि विद्यार्थी आणि पालकांची उपस्थिती होती.

 

मुख्याध्यापिका श्रीमती इंदिरा रामचंद्रन यांनी आपल्या भाषणात विद्यार्थी नेतृत्वाचे महत्त्व आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यात युवा पिढीची भूमिका यावर सखोल भाष्य केले. त्यांनी नवनियुक्त विद्यार्थी प्रतिनिधीचे अभिनंदन केले. तसेच त्यांना शाळेची मूल्ये व दृष्टिकोन जपून इतरांसाठी आदर्श उदाहरण बनण्याचे आवाहन केले.

 

द ॲकॅडमी स्कूलच्या सीईओ डॉ. मैथिली तांबे यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की, असे कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये सक्षम नेतृत्व गुण रुजवण्यासाठी आवश्यक असतात. नागरिकत्वाची जबाबदारी शाळेपासूनच सुरू होते. अशा उपक्रमांद्वारे आम्ही उद्याचे जबाबदार व्यक्तिमत्व घडवू इच्छितो आणि हेच खरं शिक्षण आहे, जे आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळते.