अन्न व औषध प्रशासन विभागाविरोधात आ. सत्यजीत तांबे यांचा आक्रमक पवित्रा
– Sting, एनालॉग पनीरसारख्या घातक पदार्थांवर तात्काळ कारवाईची मागणी
– मंत्री नरहरी झिरवाळ यांचे तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन
प्रतिनिधी | मुंबई
राज्यातील बाजारपेठांमध्ये खुलेआम विकले जाणारे Sting, एनालॉग पनीर यांसारखे भेसळयुक्त व बनावट अन्नपदार्थ महाराष्ट्रातील युवापिढीच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरत आहेत. हे पदार्थ आजही बाजारात सहज उपलब्ध असून, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून यावर कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे अधिवेशनात आमदार सत्यजीत तांबे यांनी या गंभीर विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
आ. सत्यजीत तांबे यांनी याआधीही शासन स्तरावर याविषयी सातत्याने पाठपुरावा केला आहे. २०२४ च्या पावसाळी अधिवेशनात त्यांनी सभागृहात मांडला होता. त्यानंतर जानेवारी २०२५ रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठक देखील घेण्यात आली होती. मात्र इतक्या वेळा पाठपुरावा करूनही अद्याप या विषयावर ठोस पावले उचलली गेलेली नाहीत, ही बाब चिंताजनक आहे, अशी टीका आ. तांबे यांनी केली.
अन्न व औषध प्रशासन विभागाकडून अपुरे मनुष्यबळ, अत्याधुनिक लॅबची कमतरता, वाहनांची उपलब्धता अशा कारणांचा उल्लेख वारंवार केला जातो. मात्र हे कारणं नुसती सांगून जबाबदारी झटकता येणार नाही. ही केवळ कामचुकार अधिकाऱ्यांची मानसिकता असून ती निषेधार्ह आहे, असे म्हणत आ. तांबे यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली.
यावेळी सभागृहात आ. सत्यजीत तांबे यांनी महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांना ठराविक कारवाईचे टार्गेट देण्यात यावे. आणि जे अधिकारी हे टार्गेट पूर्ण करणार नाहीत, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. आ. तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी यावर “वस्तुस्थिती मान्य आहे आणि त्यावर तातडीने उपाययोजना करण्यात येतील,” असे आश्वासन सभागृहात दिले.
राज्तयातील तरुणांच्या आरोग्यावर संकट निर्माण करणाऱ्या Sting, एनालॉग पनीर यांसारख्या घातक, बनावट व भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात आता ठोस कारवाई होईल, अशी अपेक्षा आ. तांबे यांनी व्यक्त केली. “हे पदार्थ राज्यभर सहज विकले जात आहेत आणि युवापिढीच्या जीवाशी खेळणाऱ्या या प्रकारांना अजिबात माफ केले जाणार नाही. महाराष्ट्र लवकरच या विरोधात होणारी ठोस कारवाई पाहील,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
























