महाराष्ट्र अनलॉक- नवी नियमावली जाहीर व्यापारी वर्गाला दिलासा; जळगाव जिल्ह्यातील निर्बंध शिथिल

महाराष्ट्र अनलॉक- नवी नियमावली जाहीर
व्यापारी वर्गाला दिलासा; जळगाव जिल्ह्यातील निर्बंध शिथिल

राज्य सरकारने राज्यातील नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने अनलॉकबाबतची नवी नियमावली आज जाहीर केली आहे. यामध्ये व्यापारी वर्गांचा रोष पाहता व आज सांगलीत मुख्यमंत्र्यांनी पत्रकारपरिषदेत सांगितल्या प्रमाणे दुकांनाच्या वेळा वाढवण्यात आल्या आहेत. या नव्या नियमावलीनुसार सोमवार ते शुक्रवार रात्री आठ वाजेपर्यंत तर, शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत दुकानं सुरू राहणार आहेत. या अनलॉकच्या नव्या नियमावलीकडे अवघ्या राज्याचं विशेष करून व्यापाऱ्याचं जास्त लक्ष लागलेलं होतं. यामुळे राज्यभरातील जवळपास २५ जिल्ह्यांना दिलासा मिळणार आहे. तर, ज्या भागात सध्या करोनाबाधितांची संख्या वाढत आहे, तिथे हा दिलासा नसणार आहे. मुख्यमंत्र्यांनी ही देखील माहिती आज दुपारी दिली होती. त्यामुळे ज्या ठिकाणी रूग्ण कमी होत आहेत तिथल्या नागरिकांसाठीच हा दिलासा असणार आहे. पुणे, साताऱ्यासह ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम असणार आहेत.
राज्यातील निर्बंध कायम असणाऱ्या ११ जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड आणि पालघर यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांत तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू असणार आहेत.

या नियमावलीनुसार जिम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा हे रात्री आठवाजेपर्यंत सुरू असणार आहे. मात्र यासाठी ५० टक्के क्षमतेची मर्यादा घालण्यात आली आहे. शिवाय,वातानुकुलित यंत्रणा वापरायला मात्र बंदी असणार आहे. तर, रविवारी मात्र अत्यावश्यक सेवेतली दुकानं वगळता सर्व दुकानं बंद राहतील. तर, धार्मिकस्थळ उघडण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नसून, राज्यभरात धार्मकस्थळं ही बंदच असणार आहे. तसेच, चित्रपटगृहे, नाट्यगृहे व मल्टिप्लेक्स देखील पुढील आदेशापर्यंत बंदच असणार आहेत. तर, कृषी, औद्योगीक, नागरी, दळणवळणाची कामं पूर्ण क्षमतेनं करण्यास मंजूरी दिली गेली आहे.

सरकारी आणि खासगी कार्यालयांना पूर्ण क्षमतेनं चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे. फक्त गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले आहे. याचबरोबर, जी कार्यालयं वर्क फ्रॉम होम बेसिसवर चालत होती किंवा चालू शकतात ती तशीच चालू ठेवावी, असेही सांगितले गेले आहे.

मुंबईतील लोकस सेवा तूर्तास तरी सामान्य नागरिकांसाठी बंदच असणार आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या अनलॉकच्या नव्या नियमावलीत लोकल सुरू करण्यासंदर्भात काहीही सांगितले गेले नाही. तर, मुंबई, उपनगर आणि ठाणे या ठिकाणचे निर्णय आपत्कालीन विभाग घेणार असल्याचे सांगितले गेले आहे.