पाचोरा वकील संघातर्फे माननीय न्यायाधीश औंधकर साहेब यांची पदोन्नती झाल्याने सत्कार व निरोप समारंभ
( पाचोरा प्रतिनिधी )
पाचोरा: येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे लोकप्रिय न्यायाधीश श्री. जी. बी. औंधकर साहेब यांची पदोन्नतीने बदली झाल्याबद्दल पाचोरा वकील संघातर्फे नुकताच सत्कार व निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा न्यायालयाच्या सह दिवाणी न्यायाधीश मा. बोरा मॅडम, प्रमुख अतिथी म्हणून पाचोरा न्यायालयाच्या पूर्व न्यायाधीश मा. हिवराळे मॅडम, पाचोरा वकील संघाचे सर्व पदाधिकारी व सर्व सन्माननीय सदस्य, न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाचोरा वकील संघाचे सचिव ॲड. निलेश सुर्यवंशी यांनी सर्व उपस्थित मान्यवर व विधीज्ञांचे स्वागत करून प्रास्ताविकाने कार्यक्रमास सुरुवात केली. त्यानंतर पाचोरा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. प्रविण पाटील यांनी न्यायाधीश औंधकर साहेब यांच्या कार्यकाळातील महत्त्वपूर्ण घटना आणि त्यांच्या न्यायदानातील निष्पक्षपाती दृष्टिकोन यावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, न्यायाधीश औंधकर यांनी नेहमीच कायद्याचे पालन करून सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या शांत आणि संयमी स्वभावामुळे न्यायालयीन कामकाज नेहमी सुरळीत पार पडले.
याप्रसंगी जेष्ठ विधिज्ञांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी न्यायाधीश औंधकर साहेब यांच्यासोबत काम करतानाचे अनुभव सांगितले आणि त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विधिज्ञांनी त्यांच्या न्यायप्रियतेचे, समयसूचकतेचे आणि कायद्याच्या ज्ञानाचे कौतुक केले. न्यायाधीश औंधकर साहेब यांनी वकील आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांशी समन्वय साधून काम करण्याची त्यांची पद्धत सर्वांसाठीच प्रेरणादायी होती, असे मत अनेकांनी व्यक्त केले.
आपल्या निरोपाच्या भाषणात न्यायाधीश औंधकर साहेब यांनी पाचोरा येथील विधिज्ञांनी आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. त्यांनी पाचोरामध्ये काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता, असे सांगितले. येथील वकील आणि कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या आदरामुळे ते नेहमीच या ठिकाणाला लक्षात ठेवतील, असे भावोद्गार त्यांनी काढले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पाचोरा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. प्रवीण पाटील, उपाध्यक्ष ॲड. कविता मासरे रायसाकडा, सचिव ॲड. निलेश सुर्यवंशी, सहसचिव ॲड. अंबादास गोसावी, तसेच पाचोरा वकील संघाचे सर्व सन्माननीय जेष्ठ सदस्य, ज्युनिअर सदस्य त्याचप्रमाणे महिला वकील भगिनींनी सुद्धा परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सह सचिव ॲड. अंबादास गोसावी यांनी केले. तर आभार उपाध्यक्ष ॲड. कविता मासरे रायसाकडा यांनी मानले.