राज्य पत्रकार संघाचे काम दिशादर्शक ; मंत्री गुलाबराव पाटील

राज्य पत्रकार संघाचे काम दिशादर्शक ; मंत्री गुलाबराव पाटील

पत्रकार, वृत्तपत्रांनी आत्मनिर्भर
होण्याची गरज : वसंत मुंडे

जळगाव : सरकार आणि पत्रकारांनी समन्वय राखून काम केल्यास सर्व घटकांचा विकास अधिक वेगाने होईल. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार
संघातर्फे पत्रकारांना विमा कवच देण्याची सुरू केलेली मोहिम दिशादर्शक आहे, अशा शब्दांत राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कौतुक केले. दरम्यान, जळगाव येथील पत्रकार भवन, पत्रकारांचा गृहनिर्माण संस्थाचा प्रश्न मार्गी लावू, असे ठोस आश्वासनही मंत्री पाटील यांनी दिले.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित उत्तर महाराष्ट्र पातळीवरील पत्रकार कार्यशाळा आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात उद्घाटक म्हणून मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे होते. विशेष अतिथी म्हणून महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज, जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य अधिस्वीकृती समिती अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार यदु जोशी, मंत्रालय, विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, प्रदेश सरचिटणीस डॉ विश्वासराव अरोटे, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्रवीण सपकाळे,मंगळग्रह संस्थानचे अध्यक्ष दिगंबर महाले, राष्ट्रीय करणी सेनेचे राज्य कार्याध्यक्ष प्रवीणसिहं पाटील,
खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, फैजपूरचे पांडुरंग सराफ यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, बहुतांश नेत्यांच्या निवडणुका पत्रकारावर अवलंबून असतात. त्यामुळे राजकारणी आणि पत्रकारांनी समन्वय साधून काम करण्याची गरज आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या मागण्या अतिशय रास्त आहेत. राज्य पत्रकार संघाच्या पाठीमागे मंत्री नाही तर एक सहकारी या नात्याने उभा राहिन, अशी ग्वाही पाटील यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, पत्रकार जेव्हा अडचणीत असतो, तेंव्हा कुणीच मागे उभे राहत नाही. त्यामुळे पत्रकार, वृत्तपत्रांनी आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. वृत्तपत्र व्यवसायाला अधिक बळकटी देण्यासाठी संपूर्ण राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींनी वृत्तपत्र खरेदीसाठी वार्षिक आराखड्यात १० हजार रुपयांची तरतूद करावी.
अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. केंद्राने वृत्तपत्र खरेदी करणाऱ्याला आयकरमध्ये ५ हजारांची सूट देण्यात यावी, असा ठराव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवावा, अशी मागणी केली. पत्रकार कार्यशाळा, पुरस्कार वितरण सोहळ्यासह आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर घेण्यात आले.

पत्रकारांच्या एकजुटीसाठी
वसंत मुंडे यांनी पुढाकार घ्यावा : यदु जोशी

महाराष्ट्र राज्य अधिस्वीकृती समिती अध्यक्ष यदु जोशी यांनी सांगितले, माझ्या पत्रकारितेचा प्रारंभ छोट्या साप्ताहिकापासून झालेला आहे. आपण छोटे, मोठे वृत्तपत्र असा भेद करत नाही. जाणीवपूर्वक काही घटक दिशाभूल करत आहेत, राजकीय पक्ष सत्तेसाठी एकत्र येतात, आता पत्रकारांनी आपल्या हितासाठी एकत्र आले पाहिजे, पत्रकारांच्या एकजुटीसाठी पत्रकारांचे नेते वसंत मुंडे यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यदु जोशी यांनी केले.
विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनीही महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कार्याचे कौतुक केले. सर्वाधिक सदस्य संख्या असलेली पत्रकारांची एकमेव संघटना आहे, अशा शब्दांत आपले विचार मांडले.

*पत्रकारांना १० लाखाचा विमा वितरण*

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष प्रविण सपकाळे यांच्या संकल्पनेतून पत्रकार संघांचे सभासद व फिल्डवर काम करणाऱ्या पत्रकारांचा अपघाती विमा काढण्यात येऊन त्याचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. दरम्यान विमा पॉलिसी काढण्याचे जळगाव पॅटर्न राज्यभर राबविल्या जाईल असं पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी जाहीर केले.

पत्रकारिता क्षेत्रात गेल्या ३० वर्षांपासून सेवा बजावणाऱ्या पत्रकारांना जीवन गौरव तर शोध पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले दरम्यान समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा स्मृतीचिन्ह देऊन पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.

*यांना दिला पुरस्कार*
१) प्रशांत आंबेकर (आदर्श शिक्षक)
२)डॉ. विशाल पाटील (वैद्यकीय सेवा)
३)डॉ. नरेंद्र ठाकूर (वैद्यकीय सेवा)
४)विजय पाटील (शिक्षणदूत)
५)योगेश थोरात (उत्कृष्ट अभियंता)
६)जलक्रांती गृप (जलक्रांती)
७)डॉ. युसूफ पटेल (वैद्यकीय सेवा)
८)अनिल काबरा (यशस्वी उद्योजक)
९)अमोल महाजन (आदर्श सरपंच)
१०)प्रवीणसिहं पाटील (समाजभूषण)
११)विजय शिंदे (उत्कृष्ट सेवा)
१२)जगदीश सोनवणे (उत्कृष्ट पत्रकारिता)
१३) राजू बोरसे (उत्कृष्ट पत्रकारिता)
१४)प्रा. शिवाजीराव अहिरराव (जीवन गौरव)
१५)महेश कौन्डीण्य (जीवन गौरव)
१६)विनायक दिवटे (जीवन गौरव)

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीपक सपकाळे,प्रमोद सोनवणे, भगवान मराठे, संतोष नवले,नागराज पाटील संजय चौधरी,भूषण महाजन, जयंतीलाल तज्ञ वानखेडे,योगेश सैतवाल, प्रा. विजय गाढे, मिलिंद सोनवणे,गोपाल सोनवणे, रोहन पाटील यांनी प्रयत्न केले.