Home जळगाव बारी समाजाचा अनिष्ट प्रथांविरोधात ठोस निर्णय; मेहंदी, प्री-वेडिंग शूट आणि बॅनरबाजीवर बंदी

बारी समाजाचा अनिष्ट प्रथांविरोधात ठोस निर्णय; मेहंदी, प्री-वेडिंग शूट आणि बॅनरबाजीवर बंदी

बारी समाजाचा अनिष्ट प्रथांविरोधात ठोस निर्णय; मेहंदी, प्री-वेडिंग शूट आणि बॅनरबाजीवर बंदी

 

 

 

 

सोयगाव, दत्तात्रय काटोले

सोयगाव, प्रतिनिधी : बारी समाजातील विवाह सोहळ्यांमध्ये वाढत चाललेल्या खर्चीक व अनिष्ट प्रथांना आळा घालण्यासाठी शिरसोली येथे रविवारी समाज विचारमंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले. सूर्यवंशी बारी पंच मंडळाच्या नेतृत्वाखाली आयोजित या बैठकीत विवाह सोहळे साधेपणाने आणि पारंपरिक पद्धतीने पार पाडण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय एकमताने घेण्यात आले.

शिरसोली बारी पंच मंडळाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी रतन फुसे होते. विवाह, साखरपुडा तसेच इतर सार्वजनिक कार्यक्रमांमधील वाढता अनावश्यक खर्च आणि बदलत्या चालीरितींवर यावेळी सखोल चर्चा करण्यात आली.

बैठकीत विवाह समारंभ पत्रिकेत नमूद केलेल्या मुहूर्तावर आणि वेळेतच पार पाडावेत, तसेच वैदिक पद्धतीने विवाह लावण्यास प्राधान्य द्यावे, असा निर्णय घेण्यात आला. याशिवाय मेहंदी कार्यक्रम, प्री-वेडिंग शूटिंग आणि लग्नातील बॅनरबाजी यांवर बंदी घालण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

महिलांनी सार्वजनिक ठिकाणी फेटे बांधून नृत्य करण्याची प्रथा थांबवावी, तसेच साखरपुड्याऐवजी पारंपरिक ‘नारळवाटी’ पद्धतीचा अवलंब करावा, असेही बैठकीत ठरविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत डीजे किंवा बँड वाजविण्याऐवजी मर्यादित वेळेत ध्वनिक्षेपकाद्वारे कार्यक्रम पूर्ण करून नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.

बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या आचारसंहितेचे पालन सर्व समाजबांधवांनी करणे बंधनकारक राहील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या बैठकीस पारोळा, अमळनेर, चोपडा, यावल, रावेर, ऐनपूर, भुसावळ, सोयगाव, आमखेडा, शेंदुर्णी, पहूर, जळगाव, पिंप्राळा, हरिविठ्ठल नगर, बऱ्हाणपूर, शहापूर, बंभाडा, अंतुर्ली, वालसावंगी, पारध, धामणगाव, वाघोड, चापोरा, शिरपूर आणि नंदुरबार आदी ठिकाणांतील पंच मंडळांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून सहभाग नोंदविला.

Don`t copy text!