जून महिना अर्ध्यावर, तरी पावसाचा पत्ता नाही; शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे
सोयगाव, दत्तात्रय काटोले
सोयगाव (प्रतिनिधी) जून महिना अर्ध्यावर आला असतानाही तालुक्यात समाधानकारक पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे खरीप हंगामाची संपूर्ण तयारी करून बसलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. बियाणे, खते आणि मशागतीची कामे पूर्ण झाली असली, तरी पेरणीसाठी आवश्यक ओलावा नसल्याने शेतकऱ्यांनी आकाशाकडे नजर लावली आहे. खरीप हंगामासाठी तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी नांगरणी, वखरणी, सरी वरंबे तयार करणे, तणनाशकांची फवारणी तसेच बियाणे आणि
खतांची खरेदी अशी सर्व पूर्वतयारी पूर्ण केली आहे. अनेकांनी कर्ज काढून किंवा आर्थिक जुळवाजुळव करून साहित्याची व्यवस्था केली आहे; मात्र अपेक्षित पाऊस न झाल्याने पेरणीला सुरुवात होऊ
शकलेली नाही. तालुक्यात सोयाबीन, कापूस,तूर,आणि मका ही प्रमुख पिके घेतली जातात. त्याचबरोबर मिरचीचे क्षेत्र वाढले असून अनेक शेतकऱ्यांनी पावसापूर्व लागवड केली असून विहिरीची पाणी पातळी कमी
झाल्याने अनेक शेतकरी अडचणीत सापडले आहे. यामुळे यंदाही मान्सूनच्या आगमनाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. या पिकांच्या पेरणीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा आवश्यक असतो. काही भागांत किरकोळ पाऊस झाला असला, तरी तो पेरणीसाठी अपुरा ठरत आहे. त्यामुळे दुबार पेरणीचा धोका टाळण्यासाठी शेतकरी सावध भूमिका घेत आहेत. गेल्या काही वर्षापासून हवामानातील अनिश्चितता वाढत आहे.
वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिक !
खत-बियाण्यांच्या वाढत्या
किमती, मजुरीचा वाढलेला खर्च आणि शेतमालाला मिळणारा अपुरा भाव यामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात आहेत. अशावेळी पेरणी उशिरा झाल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असून, खर्चाचा ताळमेळ बिघडण्याची भीती व्यक्त होत आहे.
बदलत्या हवामानाचा शेतीवर परिणाम
गेल्या काही वर्षांत हवामानातील अनिश्चितता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मान्सूनचे उशिरा आगमन, पावसातील दीर्घ खंड, अतिवृष्टी आणि अवकाळी पाऊस यामुळे शेतीचे नुकसान होत आहे.





















