कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करा जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर
सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करुन
विधायक कार्यावर भर देण्याचे जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन

जळगाव, (जिमाका) दि. 3 – कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करुन यावर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याबाबतचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. या मार्गदर्शक तत्वानुसार जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी कोरोना लसीकरण शिबीर, मतदार नोंदणीबाबत जनजागृती सारखे विधायक उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.
सार्वजनिक गणेशोत्सव 2021 ची पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अल्पबचत भवनात श्री. राऊत यांच्याअध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, पोलीस अधिक्षक डॉ प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक सचिन गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, महापालिकेचे उपायुक्त प्रविण पाटील, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष सचिन नारळे आदि व्यासपीठावर उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री. राऊत म्हणाले की, यंदाचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून याबाबत मार्गदर्शक सुचनाही निर्गमित केल्या आहेत. या मार्गदर्शक सुचनांची माहिती यंत्रणेने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी करुन द्यावी. त्याचबरोबर या गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांनी महापालिका व स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रमाबरोबर लसीकरण शिबिराचे आयोजन करावे. त्याचबरोबर उत्सव गणेशाचा, जागर मताधिकाराचा या उपक्रमातंर्गत मतदार नोंदणी, आजादी का अमृत महोत्सव यासारखे उपक्रम राबवावे. त्याचबरोबर श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढू नयेत. पूजा व आरती करतांना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. सार्वजनिक मंडळाकरीता मुर्ती 4 फुट व घरगुती गणपतीसाठी 2 फुटांच्या मर्यादेत असावी. श्रीगणेशाचे दर्शन सुविधा ऑनलाईन, वेबसाईट, फेसबुक, केबलद्वारे उपलब्ध करुन द्यावी. गणपती मंडपामध्ये निर्जतुकीकरणाच्या व्यवस्थेसह शरिरीक अंतराचे तसेच स्वच्छतेचे नियम पाळले जाऊन यंदाचा गणेशोत्सव आगळ्यावेगळ्या पध्दतीने व भक्तीभावात साजरा करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
*यंदाचा गणेशोत्सव हा आनंदोत्सव म्हणून साजरा करुया – डॉ. मुंढे*
शासनाच्या मार्गदशक सुचनांनुसार सार्वजनिक मंडळानी नियमांचे पालन करावे. गणेश मंडळाना कमीत कमी कागदपत्रांमध्ये आवश्यक ती परवानगी देण्यात येईल यासाठी एक खिडकी योजना सुरु करण्यात येऊन गणेश मंडळांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल. असे सांगून डॉ मुंढे म्हणाले की, यावर्षीचा गणेशोत्सव हा भक्तीमय वातावरणात आनंदोत्सव म्हणून साजरा करुया. त्याचबरोबर जिल्ह्यातील वाद्यवृंद पथकांना त्यांचे कार्यक्रम सादर करण्याची संधी देण्यासाठी शहरातील मोकळ्या जागेत त्यांचे कार्यक्रम घेऊन त्याचे लाईव्ह सादरीकरणाबाबत विचार करण्यात येईल असे पोलीस अधीक्षक डॉ मुंढे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष सचिन नारळे यांनी मंडळाची भूमिका, कार्यपध्दती व स्थापना आणि विर्सजनाबाबतची भूमिका विशद करुन गणेश मंडळांच्या ठिकाणी ज्यांना रोजगार पाहिजे त्यांची नोंदणी करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी विविध गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील रस्त्यांची दुरुस्ती व स्वच्छता, वीजेच्या तारांजवळील झाडांच्या फांदा काढणे यासारख्या विधायक सूचना मांडल्या. बैठकीच्या सुरुवातीस निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल शासनाच्या मार्गदर्शक सुचनांची माहिती सर्व यंत्रणांना दिली.
या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चिंधा (भापेसे), प्रांताधिकारी प्रसाद मते, डॉ विक्रम बांदल, विनय गोसावी, यांचेसह महापालिका, वीज वितरण कंपनी व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, तहसीलदार, नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.