सोयगाव : वन विभागाला पडला विसर ; पर्यावरण दिनी सोयगावात जनजागृती उपक्रमांचा अभाव
सोयगाव, दत्तात्रय काटोले
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी दरवर्षी ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. वृक्षारोपण, जनजागृती आणि पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी शासनाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र यंदा सोयगावात पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वन विभागाकडून कोणतेही ठळक उपक्रम राबविण्यात आले नाही. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी असलेल्या विभागालाच पर्यावरण दिनाचा विसर पडला काय, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
सोयगाव येथील वन विभाग कार्यालयाला भेट दिली असता कार्यालयात केवळ एक कर्मचारी उपस्थित असल्याचे दिसून आले. पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांबाबत माहिती घेण्यासाठी वनपाल अनिल मिसाळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांचा मोबाईल बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही.
एकीकडे शासन आणि प्रशासनाकडून “एक झाड लावा, झाडे जगवा” असा संदेश दिला जातो, तर दुसरीकडे पर्यावरण दिनासारख्या महत्त्वाच्या दिवशी संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस हालचाल दिसून न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती करणे, वृक्षारोपणाचे कार्यक्रम राबविणे आणि नागरिकांना सहभागी करून घेणे ही वन विभागाची महत्त्वाची जबाबदारी मानली जाते.
दरम्यान, शासकीय कार्यालयांमध्ये पर्यावरण दिनाबाबत विशेष उपक्रम घेण्यात.आलेले.नाही..मात्र समर्पण फाऊंडेशनच्या वतीने सोयगाव पोलिस स्टेशन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कडुलिंब आणि चिंचेची रोपे लावून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला. या उपक्रमामुळे सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतल्यास पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक प्रभावी होऊ शकते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
आज जगासमोर हवामान बदल, वाढते तापमान, पाणीटंचाई आणि जंगलतोड यांसारखी गंभीर आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत पर्यावरण दिन केवळ औपचारिकता न राहता प्रत्यक्ष कृतीचा दिवस ठरणे आवश्यक आहे. पर्यावरण रक्षणाची जबाबदारी ज्या विभागावर आहे, त्यांच्याकडूनच अधिक सक्रिय सहभागाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पर्यावरण दिनी जनजागृतीचे कार्यक्रम कुठे झाले? वृक्षारोपण किती झाले? आणि त्याची माहिती नागरिकांपर्यंत का पोहोचली नाही? अशा प्रश्नांची उत्तरे आता संबंधित विभागाने देण्याची गरज निर्माण झाली आहे.






















