पाथर्डी पोलिसांची धडाकेबाज कारवाई, कौडगाव येथे बाबाजी बर्डे यास तलवार घेऊन फिरताना तर शंकरवाडी येथे जालिंदर लोणारे यास हातभट्टीची गावठी दारू पाडताना रंगेहाथ पकडून गजाआड केले

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
पाथर्डी पोलिसांनी “सिंघम” स्टाईलने धडाकेबाज कारवाई करण्यास सुरूवात केली असुन पाथर्डी तालुक्यातील कौडगाव आठरे येथिल बाबाजी शिवाजी बर्डे,(वय वर्षे ५२)यास तलवार घेऊन फिरताना तर शंकरवाडी येथे हातभट्टीची गावठी दारू पाडताना जालिंदर दत्तात्रय लोणारे (वय वर्षे २२) या दोघांना रंगेहाथ पकडून गजाआड केले आहे.
या बाबदची माहिती अशी की दिनांक २ जून रोजी पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांना गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली होती की पाथर्डी तालुक्यातील कौडगाव आठरे येथिल पाण्याच्या टाकी जवळ एक ईसम हातात तलवार घेऊन गावात दहशत निर्माण करीत फिरत आहे.पाथर्डी पोलीसांनी क्षणाचाही विलंब न करता तातडीने त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता तेथे खरोखरच एक ईसम हातात तलवार घेऊन फिरताना आढळून आला होता.ताब्यात घेऊन त्याला त्याचे नाव गाव व पत्ता विचारला असता त्यांने त्याचे नाव बाबासाहेब शिवाजी बर्डे, राहणार कौडगाव आठरे,तालुका पाथर्डी,जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले.त्याच्या ताब्यातून विना परवाना बेकायदा १ तलवार,१ लोखंडी पाईप,व वेल्डिंग केलेला १ चैन कव्हर मिळून आल्याने त्याच्या विरोधात पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आणि त्यास तात्काळ गजाआड केले आहे.अशा प्रकारे पाथर्डी पोलिस स्टेशनच्या हद्दीत कोणी,हत्यार, गावठी कट्टा, बेकायदा शस्त्रे घेऊन फिरताना आढळून आल्यास त्या बाबत पोलीसांना गोपनीय माहिती उपलब्ध करून द्यावी असे आवाहन पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांनी केले आहे.
दुसऱ्या एका गुन्ह्यात पाथर्डी तालुक्यातील शंकरवाडी येथे जाऊन
पोलिसांनी अवैध दारू व्यवसायावर मोठा छापा टाकून हातभट्टीच्या गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला आहे.आरोपीस जागीच अटक करून त्याच्या मुसक्या आवळून त्याला गजाआड केले आहे.अवैध गावठी दारू निर्मिती व तीच्या विक्री विरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत पाथर्डी पोलिसांनी ३ जून २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास धडाकेबाज कारवाई करीत शंकरवाडी परिसरातील अड्डयावरील गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त केली आहे. या कारवाईत सुमारे एक लाख रुपयांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला ताब्यात घेऊन गजाआड करण्यात आले आहे.पाथर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तालुक्यातील शंकरवाडी गावातील गोपाळ वस्ती,येथील शिवारात अवैधरित्या गावठी दारू निर्मिती सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्या नंतर पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांच्या मार्गदर्शना खाली पोलीसांच्या विशेष पथकाने आज (दि. ३ जून) रोजी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास दोन पंचांच्या उपस्थितीत छापा टाकला होता.या कारवाई दरम्यान जालिंदर दत्तात्रय लोणारे,(वय वर्षे २२), राहणार गोपाळ वस्ती, शंकरवाडी, तालुका,पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर हा इसम हातभट्टीची गावठी दारू निर्मिती करीत असल्याचे पोलिसांना आढळून आले. घटना स्थळावर जाऊन तपासणी केली असता तेथे ७०० लिटरचे कच्चे रसायन, (किंमत ७० हजार रुपये),१५० लिटर तयार केलेली गावठी दारू, (किंमत ३० हजार रुपये), नवसागराच्या सहा वड्या,तसेच दारू निर्मिती साठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण १ लाख ३४० रुपयांचा मुद्देमाल पोलीसा कडून जप्त करण्यात आला आहे.सदरच्या कारवाईत समाजाच्या आरोग्यास घातक ठरणारे कच्चे रसायन जागीच नष्ट करण्यात आले आहे. सदर आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे (BNS) कलम १२३,२७५, तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) व (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पाथर्डी पोलिसांकडून सुरू आहे.
अवैध दारू निर्मिती व विक्री विरोधात पाथर्डी पोलीस सातत्याने कठोर भूमिका घेत असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर धंद्याविरुद्ध यापुढेही प्रभावी कारवाया सुरूच राहणार असल्याचे पोलीस प्रशासना कडून सांगण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही अहिल्या नगर जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे साहेब, शेवगाव विभागाचे उप विभागीय पोलिस अधिकारी निरज राजगुरू साहेब, यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांच्या आदेशा नुसार व पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव आणि पोलीस उपनिरीक्षक देवराव ढगे, हेड कॉन्स्टेबल संभाजी कुसाळकर, हेड कॉन्स्टेबल संदीप कानडे,पोलीस कॉन्स्टेबल भगवान टकले, संदीप कळमकर,तसेच चालक पोलीस कॉन्स्टेबल गोविंद दराडे,होमगार्ड किसन सदामत, ज्ञानेश्वर बडे यांच्या पोलिस पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे. पाथर्डी तालुक्यात अजूनही अनेक ठिकाणी अवैध, दारू,मटका, गांजा असले अवैध धंदे सुरू आहेत पोलीस पथकाने तात्काळ कारवाई करून आरोपींना तातडीने गजाआड करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
























