माझ्या मतदार संघातील शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी मी प्रयत्नशील – आ. तांबे

माझ्या मतदार संघातील शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी मी प्रयत्नशील – आ. तांबे

– शिक्षक दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये विशेष कार्यक्रम

प्रतिनिधी

अहमदनगर – शाळेमध्ये सगळं चांगलं चाललेलं असेल, तरचं मुलांच्या चेहऱ्यावरती हसू दिसतं असतं. मुलांच्या चेहऱ्यावर हसू हाच खऱ्या अर्थाने शिक्षकांना आदर्श पुरस्कार आहे. समाजामध्ये आदर्श ठेवण्याचं काम ज्याचं आहे. ते खऱ्या अर्थाने शिक्षक आहेत. त्यांच्याकडे पाहून भावी पिढी एक आदर्श ठेवत असते. म्हणून भोसले सरांनी त्यांच्या आई-वडिलांच्या प्रित्यर्थ पुण्य स्मरणाचा असा कुठलाही कार्यक्रम न ठेवता. त्याच पैशातून शाळेला सभागृह दिला. त्यासाठी त्यांचे मनापासून कौतूक केले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार सत्यजीत तांबे यांनी केले.

अकोले तालुक्यातील निपाणी पिंपळगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये कै. राधाबाई व खंडू आप्पाजी भोसले बहुउद्देशीय सभागृहाचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम मंगळवारी संपन्न झाला. त्यावेळी आमदार सत्यजीत तांबे बोलत होते.

कोतुळ, राजूर आणि समशेरपूर या तीन ठिकाणी मोठ्या अभ्यासिकाव वाचनालयासाठी ४० ते ५० लाखांचा निधी या तीन गावात दिला आहे. जेणेकरून इतर छोट्या मोठ्या खेडेगावातील मुलं त्या गावात जातील आणि अभ्यास करतील. याचं लवकरच काम सुरू होणार आहे. तसेच गावातील रस्त्यांनी देखील दुरावस्था झाली असून ही बाब सरपंचांनी निदर्शनास आणून दिली आहे. आपण रस्ता दुरूस्तीसाठी पाठपुरावा करणार आहोत, असेही आमदार सत्यजीत तांबे यांनी सांगितले.

लोकसहभागाशिवाय प्रगती अशक्य

सरकारी शाळांची लोकसहभागाशिवाय प्रगती होवू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. तालुक्यातील जास्त पटसंख्या असलेल्या शाळा असतील. त्या शाळेत शालेय उपयोगी वस्तूंची गरज आहे. त्याची यादी बनवून द्या. आपण निश्चितपणे त्या वस्तू शाळेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तुम्ही तालुक्याची यादी करा. त्याप्रमाणे आपण नियोजन करून कामे करूया, असे आश्वासन आ. तांबे यांनी दिले.