Home महाराष्ट्र सोयगाव शहरात पिसाळलेल्या श्वानांचा धुमाकूळ; नऊ जण गंभीर जखमी

सोयगाव शहरात पिसाळलेल्या श्वानांचा धुमाकूळ; नऊ जण गंभीर जखमी

सोयगाव शहरात पिसाळलेल्या श्वानांचा धुमाकूळ; नऊ जण गंभीर जखमी

 

सोयगाव — शहरात सोमवारी सकाळी पिसाळलेल्या श्वानांनी अक्षरशः धुमाकूळ घालत तब्बल नऊ जणांना चावा घेऊन गंभीर जखमी केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सुमारे दहा वाजेपासून एक ते दीड तासाच्या कालावधीत पिसाळलेल्या कुत्र्यांनी शहरातील गजानन महाराज मंदिर परिसरात अनेकांवर हल्ले केले. यामध्ये अंगणात खेळत असलेल्या अथर्व पंकज परदेशी (वय साडेतीन वर्षे, रा. शिवाजीनगर, आमखेडा परिसर) या चिमुकल्याचाही समावेश आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर आणखी आठ जणांना श्वानांनी चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर स्थानिक पातळीवर उपचार सुरू असून काहींना पुढील उपचारासाठी बाहेर हलविण्यात आले आहे.

रेबीज लसींचा तुटवडा

सोयगाव तालुक्यात डॉग बाईटनंतर आवश्यक असणाऱ्या रेबीज लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. तालुका आरोग्य विभागात रेबीज इंजेक्शन उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना उपचारासाठी जळगाव गाठावे लागत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

नागरिकांनी शहरातील मोकाट व पिसाळलेल्या श्वानांचा बंदोबस्त तातडीने करावा, तसेच रेबीज लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. तसेच आरोग्य विभाग आणि लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Don`t copy text!