भडगाव तालुक्यातील शिवनी गावचे सुपुत्र तथा नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले योगेश राजेंद्र जाधव यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन
पाचोरा/भडगाव (प्रतिनिधी) – भडगाव तालुक्यातील शिवनी गावचे सुपुत्र तथा नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले योगेश राजेंद्र जाधव यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाला गवसणी घातली आहे. त्यांच्या या यशामुळे शिवनी गावासह संपूर्ण पाचोरा-भडगाव तालुक्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
योगेश जाधव हे सन २०१२ मध्ये नवी मुंबई पोलीस दलात दाखल झाले. सेवेत असताना त्यांनी जलद प्रतिसाद पथक (Quick Response Team) तसेच वाहतूक विभागात अत्यंत जबाबदारीने कर्तव्य बजावले. पोलीस दलातील कठोर ड्युटी, ताणतणाव आणि व्यस्त वेळापत्रक सांभाळत त्यांनी एमपीएससी परीक्षेची तयारी सुरू ठेवली. नोकरी आणि अभ्यास यांचा समतोल साधत त्यांनी चिकाटीने आपले ध्येय कायम ठेवले.
याआधीही त्यांनी एमपीएससीची परीक्षा दिली होती. मात्र अत्यंत कमी फरकाने त्यांना अपयशाचा सामना करावा लागला होता. तरीही त्यांनी हार न मानता अधिक जोमाने अभ्यास सुरू ठेवला. अखेर त्यांच्या अथक परिश्रमाला यश मिळाले आणि PSI पदासाठी त्यांची निवड निश्चित झाली.
योगेश जाधव हे पाचोरा येथील SSMM College, Pachora चे माजी विद्यार्थी आहेत. शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. महाविद्यालयाच्या क्रॉस कंट्री संघाचे त्यांनी नेतृत्व केले असून त्यांच्या नेतृत्वगुणांचे तेव्हाच कौतुक झाले होते.
साध्या कुटुंबातून पुढे येत जिद्द, शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी मिळवलेले हे यश अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या यशाबद्दल शिवनी ग्रामस्थ, मित्रपरिवार, शिक्षकवृंद, पोलीस सहकारी तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






















