मुख्यमंत्री आणि केंद्रीय रस्ते विकास मंत्री साहेब एक मे रोजी काम सुरू होणाऱ्या मुंबई पुणे मिसिंग महामार्गाला स्वातंत्र्यवीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर यांचे नाव द्या,देशातील सकल धनगर समाजाची मागणी
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
१ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनाच्या शुभ मुहूर्तावर सुरू होणाऱ्या मुंबई पुणे मिसिंग लिंक या महामार्गाला “स्वातंत्र्यवीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर” यांचे नाव द्यावे आणि त्यांचा सन्मान करावा अशी मागणी देशातील सकल धनगर समाजातर्फे करण्यात येत आहे.या उद्घाटना साठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नामदार नितीन गडकरी साहेब, राज्य परीवहन मंत्री प्रतापराव सरनाईक साहेब यांच्या सह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.
उद्याच्या १ मे ला चालू होणाऱ्या मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ या महामार्गाला स्वातंत्र्यवीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर’ यांचे नाव द्यावे आणि सकल धनगर समाजाचा सन्मान करावा अशी तमाम धनगर समाजाच्या वतीने शासनाला विनंती करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या ख॔डेरायाचे सगेसोयरे आणि दऱ्याखोऱ्यांत मेंढरे घेऊन फिरणारा आपला धनगर समाज पाहिल्यावर धनगर समाजाच्या आया बहिणींच्या काबाड कष्टाची आठवण आल्या शिवाय राहत नाही.जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर असलेला आणि आता ओळखला जाणारा खंडाळा घाट म्हणजेच इतिहास कालीन “व्यापारी बोरघाट” होय. याच मार्गावर बोर घाटाच्या माथ्यावर “हुतात्मा वीर शिंग्रोबा” धनगराचे छोटेसे मंदिर आहे. याच बोरघाटात ब्रिटिशांच्या काळात दऱ्याखोऱ्यांत आणि निसर्गाच्या सान्निध्यात “शिंग्रोबा” नावाचा धनगर राहत होता. शिंग्रोबा पिढ्यानपिढ्या या घाटाच्या कुशीत, डोंगराच्या माथ्यावर, डोंगर-कपारीत आपली मेढरं चारायला घेऊन जात होता. त्यामुळे त्याला येथील दऱ्या खोऱ्यांची, निसर्गाची,कड्या कपारींची आणि जमिनीच्या भुसभुशीत पणा,कठोरपणाची खडा न् खडा माहिती होती.
इंग्रजांनी सन १८५२ साली जेव्हा मुंबई ते ठाणे ही रेल्वे थेट पुण्यापर्यंत आणण्याचा प्रस्ताव तयार केला होता. तेव्हा इंग्रजांनी एका छोटी कमिटी स्थापना केली. ती कमिटी जंगलांतून मार्ग कसा काढायचा याचा शोध घेत थेट खंडाळ्याच्या घाटात आली होती. पण त्यांना काही केल्या या रस्त्यासाठी ठोस असा उपाय सापडत नव्हता. ते रोज यायचे आणि इकडे तिकडे भटकत चाचपडत बसायचे.तेथे वर घाटात मेंढरांना चरायला घेऊन येणारा शिंग्रोबा धनगर झाडाच्या आडोशाला बसून दररोज त्यांची भटकंती नंतर होणारी हताशपणे झालेली केविलवाणी अवस्था पाहून मजा पहात बसायचा.शेवटी ते इंग्रज अधिकारी वैतागून काम अर्धवट सोडून परत माघारी जाण्याच्या मनस्थितीत होते.ते पुन्हा परतीच्या प्रवासाच्या तयारीलाही ते लागले होते.तेव्हा न राहवून शिंग्रोबा धनगराने त्यांना विचारले की “म्या तुम्हाला या भागात रोज फिरताना बघतोया, नेमक काय करायचा बेत हाय तुमचा या डोंगरात? त्यावर इंग्रज अधिकारी म्हणाले की आम्हाला मुंबई-ठाणे ही रेल्वे पुण्यापर्यंत घेऊन जायची आहे. त्यासाठी आम्ही रेल्वे रूळ बसवायला जागा शोधतोय,पण आम्हाला काही केल्या योग्य असा मार्ग सापडत नाही,म्हणून आम्ही आता हे काम अर्धवट सोडून परत माघारी जाण्याचा आमचा विचार आहे हे ऐकताच शिंग्रोबा धनगर म्हणाला ” हा तिच्यायला एवढंच काम हाय व्हय,चला मग मी दाखिवतो रस्ता तुमाला,चला या माझ्या मागनं,हा दिलासा पाहुन इंग्रज अधिकाऱ्यांना भलतेच आश्चर्य वाटले आणि त्यांना मनातून खूप आनंद ही झाला.ते सर्व इंग्रज अधिकारी शिंग्रोबा धनगराच्या पाठीमागे चालू लागले आणि शिंग्रोबा मार्ग दाखवत पुढे चालू लागला. अशाप्रकारे शिंग्रोबा धनगराने इंग्रजांना घाटावर जायचा सरळ आणि सोपा मार्ग दाखवला.
इंग्रज अधिकारी वर्गाच्या कमिटीला रस्त्यासाठी मार्ग सापडल्याचा अतिशय आनंद झाला, ते सर्व इंग्रज अधिकारी शिंग्रोबा धनगराला म्हणाले की “आम्ही तुझ्यावर खूप खुश आहोत. तुला आता आमच्या कडून काय पाहिजे असेल ते माग तुला ते आम्ही देऊ ,त्यावेळी सर्व सारासार विचार करून शिंग्रोबा धनगर म्हणाला की सायेब… मला बाकी काय देऊ नका तुमचं, (आम्हाला फकस्त स्वातंत्र्य द्या)हे ऐकताच इंग्रज अधिकारी भलतेच चवताळले आणि त्यांनी आपल्या बंदुकीला चाप लावून बंदुकीतून धडा धडा गोळ्या घालून शिंग्रोबा धनगराचा घात करुन ठार केले. शिंग्रोबाने दिलेल्या माहितीच्या आधारे आणि वैज्ञानिक तपासणी करून, सह्याद्रीच्या कड्या कपारींचा काळापहाड डोंगर फोडून रेल्वे मार्ग तयार करण्यात आला आणि त्याच रस्त्यावर रेल्वेगाडय़ा धुराच्या लोळाच्या नळकांड्या उडवित,आणि रेल्वेचा कर्कश हॉर्नचा भोंगा वाजवित डौलाने धावू लागल्या.
ज्या ठिकाणी इंग्रजांनी अतिशय कट कारस्थान करून कपटाने अत्यंत क्रुरपणे शिंग्रोबा धनगराला ठार मारले त्याच जागेवर १९२९ साली एक छोटस मंदिर वजा स्मारक बांधण्यात आले.आणि पुढे धनगरांची आधुनिक देवता म्हणुन शिंग्रोबा धनगर प्रसिध्द झाला. या मंदिरा विषयी रितीरिवाज आणि अनेक गोष्टी आजही प्रचलित आहेत.आजही धष्ट पुष्ट झालेली मेंढर घेऊन जेव्हा धनगर खाली कोकणात मेंढ्या घेऊन उतरतात, तेव्हा शिंग्रोबाच्या मंदिरात जाऊन हे धनगर लोकं मेंढीच्या पान्हातून थेट दुधाच्या धारेचा महाअभीषेक घालतात. मंदिरात तांदळा स्वरुपात शेंदुराने माखवलेली एक मोठी शिळा आहे.आत त्रिशुळ आणि धनगराची घुंगरू लावलेली काठी ठेवलेली आहे. जेव्हा नवी मुंबई-पुणे हा महामार्ग अस्तित्वात नव्हता तेव्हा खंडाळा घाट चढताना काही क्षणासाठी एसटी बसेस,आणि इतर बाकीच्या सर्व गाड्या तिथे थांबायच्या आणि प्रत्येकाची खिडकीतून बाहेर शिंग्रोबाला एक नाणे अर्पण करण्या साठीची अतिशय धडपड सुरू असायची. आजही अनेक जण या घाटातून प्रवास करताना थोडा वेळ थांबुन शिंग्रोबाचे दर्शन घेऊनच पुढच्या प्रवासाला निघतात. अशा या महान संघर्ष योद्धयाचे स्मरण करून येणाऱ्या १ मे २०२६ ला सुरू होणाऱ्या मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ महामार्गाला “स्वातंत्र्यवीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर”यांचे नाव द्यावे आणि त्यांचा सन्मान करावा ही शासनाला महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाच्या वतीने मागणी करण्यात येत आहे.या मागणी साठी देशातील सर्व धनगर समाज एकवटला आहे.या मागणीसाठी संबंधित सर्व मंत्र्यांना राज्यातील धनगर समाजाच्या वतीने हजारो ईमेल पाठवून विनंती करण्यात आली आहे.१ मे २०२६ रोजी या मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांनी या शुभारंभ सोहळ्यास कार्यक्रम स्थळी हातात पिवळे झेंडे घेऊन उपस्थित रहावे असे आवाहन सकल धनगर समाजाच्या आणि राजकीय परीवर्तन परीषदेच्या वतीने करण्यात आले आहे.























