Home पाचोरा तालुका अक्षय तृतीयेचा अनोखा संकल्प: नांद्रा-आसनखेडा वनक्षेत्रातील तप्त पाणवठे झाले तृप्त

अक्षय तृतीयेचा अनोखा संकल्प: नांद्रा-आसनखेडा वनक्षेत्रातील तप्त पाणवठे झाले तृप्त

अक्षय तृतीयेचा अनोखा संकल्प: नांद्रा-आसनखेडा वनक्षेत्रातील तप्त पाणवठे झाले तृप्त

नांद्रा ग्रामपंचायत सदस्य किशोर पाटील यांच्या पुढाकाराने वन्यजीवांसाठी पाणीपुरवठा; वनविभागाच्या सहकार्याने स्तुत्य उपक्रमाचे कौतुक

 

 

 

पाचोरा (प्रतिनिधी):ता.१९

वाढत्या उन्हाची तीव्रता आणि जंगलातील आटलेले पाण्याचे स्रोत लक्षात घेता, मुक्या प्राण्यांची तहान भागवण्यासाठी नांद्रा येथील ग्रामपंचायत सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते किशोर पाटील यांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर एक आदर्श सामाजिक उपक्रम राबविला आहे. नांद्रा-आसनखेडा वनक्षेत्रातील कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी भरून त्यांनी वन्यजीवांना मोठा दिलासा दिला आहे.

मुक्या प्राण्यांना जीवदान:

सध्या उन्हाळा शिगेला पोहोचला असून वनक्षेत्रातील नैसर्गिक पाण्याचे साठे कोरडे पडले आहेत. पाण्यासाठी वन्यजीवांची दाहीदिशा भटकंती होत असल्याने, अक्षय तृतीयेचे औचित्य साधत किशोर आप्पा यांनी स्वखर्चातून व स्वकष्टाने या पाणवठ्यांमध्ये पाण्याची सोय केली.

प्रशासनाचे मोलाचे सहकार्य:

या कार्यात वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. वनपाल रोहिणी सोनार, वनरक्षक खतिजा शेख आणि वनसेवक राहुल कोळी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून हे पाणवठे भरण्यास मदत केली. शासकीय यंत्रणा आणि सामाजिक कार्यकर्ते जेव्हा हातात हात घालून काम करतात, तेव्हा त्याचे सकारात्मक परिणाम निसर्गावर कसे उमटतात, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.

सर्वत्र कौतुक:

निसर्ग आणि वन्यजीवांचे रक्षण ही केवळ सरकारची जबाबदारी नसून ती लोकचळवळ व्हावी, हाच संदेश या उपक्रमातून देण्यात आला. किशोर पाटील ग्रामपंचायत सदस्य नांद्रा यांच्या या संवेदनशीलतेबद्दल परिसरातील पर्यावरणप्रेमी आणि ग्रामस्थांकडून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

Don`t copy text!