श्रीराम नवमीच्या पावन पर्वानिमित्त पाचोरा येथील महावीर व्यायामशाळेत पारंपरिक उत्साहात आखाडा पूजन सोहळा संपन्न
पाचोरा | प्रतिनिधी संदीप तांबे
श्रीराम नवमीच्या पावन पर्वानिमित्त पाचोरा येथील महावीर व्यायामशाळेत पारंपरिक उत्साहात आखाडा पूजन सोहळा संपन्न झाला. कुस्ती परंपरेत महत्त्वाचे स्थान असलेल्या या सोहळ्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही आखाड्याच्या मातीचे शुद्धीकरण करण्यासाठी तूप, तेल व हळद टाकून विधीपूर्वक पूजन करण्यात आले.
यंदाच्या वर्षी या उपक्रमाला सुगरण डेअरी अँड बेकर्सचे संचालक महेश शिवाजी वाघ तसेच समर्पित महेश वाघ यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या वतीने तब्बल 120 किलो गावरान तूप आखाडा पूजन व अभिषेकासाठी देण्यात आले, ज्यामुळे सोहळ्याला अधिक भव्यता प्राप्त झाली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रीराम भक्त हनुमानजी यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी महावीर व्यायामशाळेचे संस्थापक अध्यक्ष कैलास आमले सर, अध्यक्ष राजेंद्र सुखदेव पाटील, तसेच व्यायामशाळेचे वस्ताद गंप्पा पहलवान यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच निलेश पाटील, राहुल पाटील, बापू मिस्तरी, शुभम पहलवान, यश भोसले, अनिकेत पहलवान, भोला पहलवान, अमित पहलवान, सोनू पहलवान आदी पहलवान मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी सुगरण डेअरीच्या संचालकांचे मनःपूर्वक आभार मानले.
या पारंपरिक व धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून, युवकांमध्ये कुस्ती परंपरेबद्दल नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.























