गाळण येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर संपन्न
पाचोरा (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत गाळण बु. ता. पाचोरा येथे दि. 7 मार्च 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी श्री. भूषण अहिरे यांच्या हस्ते झाले.
शिबिराची प्रस्तावना पाचोरा तहसीलदार श्री. विजय बनसोडे यांनी केली, तर सूत्रसंचालन मंडळ अधिकारी श्री. सचिन मोरे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यात प्रजेच्या अडचणी त्वरित सोडविण्याची परंपरा निर्माण केली. त्याच विचारातून शासनाने नागरिकांच्या समस्या स्थानिक पातळीवर सोडविण्यासाठी हा अभिनव उपक्रम सुरू केल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या शिबिराच्या माध्यमातून महसूल, ग्रामपंचायत, कृषी, सामाजिक न्याय, आरोग्य, पाणीपुरवठा, एस.टी. महामंडळ तसेच इतर विविध शासकीय विभागांशी संबंधित तक्रारी व अर्ज स्वीकारून त्यांचे तात्काळ निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. गाळण मंडळातील व परिसरातील हजारो नागरिकांनी शिबिराला भेट देत विविध योजनांची माहिती घेतली व अर्ज सादर केले.
शिबिरात संजय गांधी योजनेचे लाभार्थी, कृषी विभागामार्फत शेती उपयोगी अवजारे वाटप, पुरवठा विभागाकडून ई-शिधापत्रिका वाटप, एस.टी. महामंडळाच्या NCMC कार्ड नोंदणी, वारस दाखले, 7/12 दुरुस्ती, उत्पन्न दाखले आदी सेवांचा लाभ नागरिकांना देण्यात आला.
लाभांचे वितरण उपविभागीय अधिकारी श्री. भूषण अहिरे, तहसीलदार श्री. विजय बनसोडे, कृषी अधिकारी श्री. सुधाकर काडू तसेच पाचोरा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष श्री. किशोर बारकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी श्री. राजेंद्र रामभाऊ पाटील, श्री. सतीश प्रकाश जाधव, श्री. रमेश हिरामण राठोड, श्री. आत्माराम हरी राठोड, श्री. डॉ. बी.बी. राजपूत, श्री. लीलाधर मुकुंद पाटील, श्री. डॉ. पी.एन. पाटील, श्री. अनिल धन पाटील तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार श्री. विनोद कुमावत, श्री. प्रमोद मोरे, श्रीमती प्रतिभा राजपूत, श्रीमती सुषमा उरकुडे, मंडळ अधिकारी आर.डी. पाटील, सचिन मोरे, ग्राम महसूल अधिकारी राजेंद्र शिरसाठ, अतुल पाटील, सागर बागुल, योगेश पाटील, बबन मंढळे, तात्याराव सपकाळ, श्रीमती प्रीती पाटील, महसूल सेवक, पोलीस पाटील, रेशन दुकानदार तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या शिबिरामध्ये सर्व विभागांच्या माध्यमातून एकूण १०२३ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.
























