माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मीरी पाणी प्रश्नी आंदोलनाचा इशारा देताच प्रशासनाचे धाबे दणाणले

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
महाराष्ट्र राज्याचे माजी उर्जा राज्यमंत्री आणि राहुरी-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांनी मीरी गावातील पाणी प्रश्नावर आंदोलनाचा इशारा देताच अहिल्या नगर आणि पाथर्डी येथील प्रशासनाचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. अजुन उन्हाळा सुरू झाला नाही तोच मीरी गावचा पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.पाणी पुरवठा सुरळीत होत नाही म्हणून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे २६ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे पाथर्डी तालुक्यातील पाणी पुरवठा विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.प्राजक्तदादा तनपुरे यांनी मीरी गावातील जनतेसाठी स्व खर्चाने पिण्याच्या पाण्याची टॅंकर द्वारे व्यवस्था केली आहे.जो पर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत मोफत टॅंकर सुविधा सुरूच राहील असे आश्वासन तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत दिले होते.मीरी गावासाठी मोफत टॅंकर सुविधा सुरू होऊन बराच कालावधी लोटला तरी प्रशासनाची टोलवाटोलवी सुरूच आहे.मीरी येथील नवीन पाणी पुरवठा योजना सुरू करण्याचे कार्यारंभ आदेश दिनांक २१/१२/२०२२ रोजी देण्यात आले होते.आणि हे काम पूर्ण करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी देण्यात आला होता.परंतु अजुनही या योजनेचे काम पूर्ण केले नाही. मीरी येथे मोठ्या प्रमाणावर पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.केवळ ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे आणि दिरंगाई मुळे हे काम पूर्ण होत नाही म्हणून मीरी ग्रामस्थांचे पाण्यावरून अतिशय हाल होत आहेत.या नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम आठ दिवसांत पूर्ण न झाल्यास मीरी -तिसगाव रस्त्यावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे प्रशासनाला देण्यात आला आहे.हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात येणार आहे.या निवेदनाच्या प्रती पाथर्डी पंचायत समिती आणि अहिल्या नगर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाचे अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.२१/१२/ २०२२ ते २६/२/२०२६ पर्यंत पाणी पुरवठा योजनेचे अधिकारी काय गोट्या खेळत होते की काय असा संतप्त सवाल मीरी येथील ग्रामस्थ मोठ्या पोट तिडकीने विचारत आहेत.संपुर्ण अहिल्या नगर जिल्ह्यात “जलजिवन” मिशन पाणी पुरवठा योजनेचे अधिकाऱ्यांच्या आणि ठेकेदाराच्या गलथान कारभारा मुळे प्रत्येक गावात तिनं तेरा वाजले आहेत.या योजनेचे अनेक गावांतील काळे पाईप गायब झाले आहेत.तर काही गावात तर या योजनेच्या विहीरीच खोदलेल्या नाहीत.जुन्याच पाईप लाईन वापरून बोगस बीले काढण्यात आली आहेत.शेवगाव-पाथर्डी,राहुरी, नेवासा तालुक्यातील अनेक गावांत ही योजना फक्त कागदोपत्री व्यवहार दाखवून या योजनेचे अनुदान गायब करण्यात आले आहे.सरकारने या योजनेच्या कामाची वरीष्ठ पातळीवरून चौकशी केल्यावर सारे गौडबंगाल बाहेर येणार आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून वापरण्यात आलेला निधी नेमका कोठे गेला याचा जाब प्रशासना कडून जनतेला द्यावा लागेल आणि ठेकेदार व अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडणार आहे. मीरी येथील रेट्रोफिटींग नळपाणी पुरवठा योजनेचे काम हे कासवाच्या गतीने सुरू आहे. पिण्याच्या पाण्याचा बोजवारा उडाला असून अधिकारी आणि ठेकेदाराच्या गलथान कारभाराचा फटका मीरी ग्रामस्थांना बसला आहे.त्यामुळे अधिकारी वर्ग नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आता उन्हाळा सुरू होण्याच्या मार्गावर असतानाच पाणी प्रश्नावर तोडगा निघाला नाही तर संपूर्ण जिल्ह्यातच पाणी प्रश्न पेटणार आहे.






















