स्मार्ट मीटर बसविण्यास कुसुंबे ग्रामपंचायतीचा जाहीर विरोध; ग्रामपंचायतीचा ठराव मंजूर
जळगाव प्रतिनिधी मकरंद कुलकर्णी : तालुक्यातील कुसुंबे ग्रामपंचायतीने स्मार्ट मीटर बसविण्यास जाहीर विरोध दर्शविला आहे. याबाबत आज ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष ठराव मंजूर करून तो महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला.
ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतीकडे स्मार्ट मीटर संदर्भात हजारो तक्रारी प्राप्त होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. वारंवार होणारा वीजपुरवठ्याचा खंडित लपंडाव, तसेच अवाजवी वाढीव वीजबिल हे स्मार्ट मीटरविरोधातील मुख्य कारण असल्याचे ग्रामपंचायतीने स्पष्ट केले आहे.
यासोबतच संबंधित ठेकेदाराची माणसे ग्राहकांना “तुमच्या मीटरमध्ये छेडछाड आहे” अशी भीती दाखवून पैशांची मागणी करत असल्याच्या तक्रारीही समोर आल्याचे ठरावात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
महावितरणने स्मार्ट मीटर बसविण्याआधी गावातील नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणे, नवीन वीज खांब उभारणे तसेच केबलचे रखडलेले काम पूर्ण करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी ठाम मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी सरपंच अशोक पाटील, उपसरपंच चंद्रकांत पाटील, तसेच ग्रामपंचायत सदस्य रामदास कोळी, भूषण पाटील, विशाल राणे, प्रमोद घुगे आदी उपस्थित होते.

















