महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय; पाचोऱ्यात उद्या सौ. सुनीताताई किशोर पाटील यांच्या पदग्रहणातून परिवर्तनाची दिशा

महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय; पाचोऱ्यात उद्या सौ. सुनीताताई किशोर पाटील यांच्या पदग्रहणातून परिवर्तनाची दिशा

 

 

 

पाचोरा | प्रतिनिधी

राजमाता जिजाऊ जयंती, सावित्रीबाई फुले जयंती आणि महिला मुक्तिदिनाच्या प्रेरणादायी पार्श्वभूमीवर पाचोरा शहरात सामाजिक व राजकीय परिवर्तनाचा नवा अध्याय उद्या लिहिला जाणार आहे. शिवसेनेच्या नेत्या तथा पाचोरा नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. सुनीताताई किशोर (आप्पा) पाटील यांच्या नगराध्यक्षपदाचा पदग्रहण सोहळा उद्या मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.

दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता मानिंग ग्राउंड, पाचोरा येथे हा पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला असून, या निमित्ताने महिलांच्या सक्षमीकरणाला केंद्रस्थानी ठेवणारा विशेष कार्यक्रम व महिला बचत गटांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांचा आत्मविश्वास वाढवणे, आर्थिक स्वावलंबन साधणे आणि नेतृत्वक्षमता विकसित करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश राहणार आहे.

या कार्यक्रमात शासनाच्या विविध योजना, महिला बचत गटांचे संघटन, स्वयंरोजगाराच्या संधी तसेच महिलांच्या हक्कांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. महिलांनी केवळ घरापुरते न राहता सामाजिक, आर्थिक व प्रशासकीय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असा संदेश या उपक्रमातून देण्यात येणार आहे.

लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारताना सौ. सुनीताताई किशोर पाटील शहराच्या सर्वांगीण विकासासोबत महिलांना विकासाच्या केंद्रस्थानी ठेवण्याचा स्पष्ट निर्धार व्यक्त करणार आहेत. पारदर्शक प्रशासन, लोकसहभाग आणि महिला-केंद्रित धोरणांना प्राधान्य देत स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण या मूलभूत नागरी प्रश्नांवर विशेष लक्ष देण्याचा त्यांचा मानस आहे.

या पदग्रहण सोहळ्यास शहरातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, पाचोरा नगरपरिषदेच्या कारभारात सकारात्मक व विकासाभिमुख बदल घडवून आणण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त केली जाणार आहे. सत्ताधारी व विरोधकांनी एकत्रितपणे शहराच्या विकासासाठी काम करावे, असा संदेशही या सोहळ्यातून दिला जाणार आहे.

महिला मुक्तिदिनाच्या निमित्ताने आयोजित हा कार्यक्रम केवळ पदग्रहणापुरता मर्यादित न राहता, पाचोरा शहरातील महिलांसाठी नवी दिशा, नवा आत्मविश्वास आणि नव्या संधी निर्माण करणारा ठरणार असल्याचे चित्र आहे. एकूणच, पाचोरा नगरपरिषदेच्या नेतृत्वात सुरू होणारे हे नवे पर्व शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आशादायी ठरणार आहे.