कडगाव येथील कारभारी रामदास शिरसाट यांच्या खूनातील चौथ्या फरारी मारेकऱ्यांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

कडगाव येथील कारभारी रामदास शिरसाट यांच्या खूनातील चौथ्या फरारी मारेकऱ्यांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

 

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) ‌ दिनांक १० नोव्हेंबर २०२३ रोजी धनत्रयोदशी च्या दिवशी अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कडगाव येथील प्रगतिशील शेतकरी कारभारी रामदास शिरसाट (वय ५५) यांची त्यांच्या शेतातील कांदा चाळीत झोपून रात्री कापसाचे राखन करीत असताना आरोपी नंबर १) भाऊसाहेब अशोक निकम (वय २२),राहणार, लोहगाव,तालुका पैठण,जिल्हा संभाजीनगर,२) अशोक संजय गीते,(वय२३), व ३) श्रीकांत रावसाहेब सुर्यवंशी (वय२०) दोघे राहणार कडगाव ता.पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर,४)करण अजिनाथ कोरडे,(वय२१) राहणार मीरी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर, या चौघांनी संगनमत करून रग आणि उशिच्या सहाय्याने तोंड दाबून धरून जीवे ठार मारून खून केला होता.आणि कांद्याच्या चाळीतील कापसाने भरलेल्या १४ गोण्या शेजारच्या शेतकऱ्याच्या ऊसात ठेवून पसार झाले होते. याबाबत पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ११४८/२०२३ तत्कालीन भारतीय दंड संहिता कलम ४६०,३२,३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.वरील चार आरोपी पैकी भाऊसाहेब अशोक निकम, अशोक संजय गीते,श्रीकांत रावसाहेब सुर्यवंशी या तिघांना पोलिसांनी अटक करून त्यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.या गुन्ह्याचा तपास लागल्या पासून चौथा आरोपी करण अजिनाथ कोरडे (वय२१) राहणार मीरी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर हा फरारच होता.तो मुंबई,गुजरात आणि ईतर ठिकाणी जागा बदलत थांबून पोलीसांच्या हातावर तुरी देऊन पसार होण्यात यशस्वी होत होता. परंतु शुक्रवार दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी तो अमावस्या निमित्ताने देवदर्शन करून आपल्या राहत्या घरी आला असल्याची खबर गुप्त खबऱ्या मार्फत पाथर्डी पोलिसांना मिळाली होती. मग पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांनी आपल्या पोलिस फौज फाट्यासह कडगाव येथे जाऊन शोध घेतला असता संशयित आरोपी करण अजिनाथ कोरडे हा पोलीसांना पाहून पळून जात असताना पोलिसांनी त्याला पाठलाग करून रंगेहाथ पकडले. सदर गुन्ह्याच्या तपासासाठी त्याला दिनांक १९/१२/२०२५ रोजी अटक केली व पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये दाखल करून त्यास पाथर्डी न्यायालयात हजर केले असता न्यायालया तर्फे त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. सदरची कारवाई ही अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे साहेब, शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी निरज राजगुरू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांच्या पोलिस पथकातील पोलिस उपनिरीक्षक नितीन दराडे, पोलिस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब बडे, पोलिस कॉन्स्टेबल संभाजी कुसळकर, संभाजी टकले, अक्षय बडे यांच्या पथकाने केली.ही घटना धनत्रयोदशीच्या दिवशी मध्यरात्री घडली होती.कापसाची चोरी करण्याच्या उद्देशाने हा खून करण्यात आला होता.पाथर्डी पोलिस स्टेशनचे तत्कालीन कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब,उप अधीक्षक प्रशांत खैरे,शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली होती.ठसेतज्ञ आणि श्वानपथकास ही पाचारण करण्यात आले होते.श्वान पथकातील श्वानाने थेट मारेकऱ्यांनी कापसाच्या गोण्या ज्या ठिकाणी उसात लपवून ठेवल्या होत्या तेथपर्यंत माग काढला होता.मयत कारभारी शिरसाट यांचा मृतदेह उत्तरीय तपासणी साठी प्रथम पाथर्डी,मग अहिल्यानगर आणि नंतर थेट संभाजी नगर येथे पाठवून दिला होता.श्वास गुदमरून मृत्यू झाला असा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरून आरोपीचा माग काढत शोध घेतला होता.ऐन दिवाळीच्या दिवशी मयत झालेल्या कारभारी रामदास शिरसाट यांच्या वर त्यांच्या मीरी-मोहोज रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले होते.मयत शिरसाट हे अतिशय कष्टाळू होते.त्यांचा एक मुलगा सैन्यदलात होता तर दुसरा इंजिनिअर झालेला आहे.मुलगी वन खात्यात नोकरीला लागली होती.ऐन दिवाळीत खून झाल्याने कडगाव परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.त्यावेळी आर पीआय चे संजय डोळसे,सरपंच विजया गीते, यांच्या सह अनेक ग्रामस्थांनी हा पुर्व नियोजित हत्येचा कट आहे असा संशय व्यक्त केला होता.आणि त्यांनी लगेचच जिल्हा पोलिस अधीक्षक साहेब यांना निवेदन देऊन त्या निवेदनावर सुभाष साळवे,माजी सरपंच आदिनाथ सोलाट,शिवाजी मचे,विक्रम जाधव,रामेश्वर फसले,विजय मचे,गौतम कराळे, विठ्ठल शिदोरे,सुदाम गीते,अक्षय शिरसाट,माजी सरपंच शंकर शिरसाट,दत्तू कोरडे,गणेश खाडे,गणेश बर्डे, मनिषा शिरसाट, मनकर्णा शिरसाट यांनी आवाज उठवला होता.धनत्रयोदशीच्या दिवशी खून झाल्याच्या निषेधार्थ आणि ऐन दिवाळीच्या दिवशी अंत्यसंस्कार झाल्याने नागरिकांनी काळी दिवाळी साजरी केली होती.सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. न्यायालयाने त्यांना कडक शिक्षा दिली पाहिजे अशी मयताच्या कुटूंबाची अपेक्षा आहे.