सोयगावात अवैध वाळू माफियांचा धुडगूस — महसूल अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत हायवा पसार, महिला कर्मचाऱ्यांचा थरारक बचाव

सोयगावात अवैध वाळू माफियांचा धुडगूस — महसूल अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत हायवा पसार, महिला कर्मचाऱ्यांचा थरारक बचाव

 

 

 

सोयगाव | १५ सध्याच्या परिस्थितीत सोयगाव तालुक्यात अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असतानाच महसूल विभागाच्या कारवाईला खुलेआम आव्हान देणारी गंभीर घटना समोर आली आहे. सोयगाव तहसील कार्यालयासमोर उभे असताना जळगाव जिल्ह्यातून अवैध वाळूने भरलेला हायवा जात असल्याचे लक्षात येताच नायब तहसीलदार संभाजी देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ पाठलाग करत सदर हायवा जंगलाताडा परिसरात पकडला.

 

तपासणीदरम्यान हायवाकडे कोणताही वैध परवाना (रॉयल्टी) नसल्याचे स्पष्ट झाले. कारवाईसाठी वाळू पथकातील दोन पुरुष कर्मचारी व एक महिला कर्मचारी वाहनात बसण्याच्या तयारीत असताना चालक व महसूल कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. याच गोंधळाचा फायदा घेत हायवा चालकाने अचानक वाहन ताब्यात घेऊन सोयगाव–शेंदुर्णी बायपास रोडने तब्बल ७० ते ८० किमी प्रतितास वेगाने गाडी पळवली, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.

 

विशेष म्हणजे, या हायवामध्ये महसूल पथकातील कर्मचारी बसणार होते. मात्र चालकाने मुद्दाम वेळकाढूपणा करत जंगलाताडा येथे गाडीतून उतरून चावी घेऊन पलायन केले. काही वेळानंतर वाहनाचा मालक (सांगण्यावरून) हायवा घेऊन सोयगावच्या दिशेने येत असताना, महसूल कर्मचाऱ्यांना चकवा देत तोही पसार झाल्याचे सांगण्यात येते. या थरारक घटनेत महिला कर्मचारी थोडक्यात बचावल्या, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.

 

घटनेनंतर संपूर्ण महसूल पथकाने थेट सोयगाव पोलीस स्टेशन गाठले. मात्र शासकीय कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणण्याचा गंभीर प्रकार असूनही गुन्हा दाखल करण्यासाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली. रात्री उशिरापर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू होती.

 

या कारवाईदरम्यान नायब तहसीलदार संभाजी देशमुख, गणेश ठोबरे, संतोष राऊत, संभाजी बोरसे, मंडळ अधिकारी जरंडी, पडके, पडीत, डिघाळे, देवताळे, भोबडे, शिवाजी शेरे, अंकुश चव्हाण आदी कर्मचारी उपस्थित होते.

 

या घटनेमुळे सोयगाव तालुक्यात अवैध वाळू माफियांचे मनोबल वाढल्याचे स्पष्ट झाले असून, महसूल कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. संबंधित चालक व वाहन मालकावर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.रात्री उशिरापर्यंत तहसील येथील कर्मचारी यांच्या सह दोन महिला कर्मचारी उपस्थित होते.