५१ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा
धाराशिव, ठाणे, पुणे, सांगलीचे दमदार प्रदर्शन; उपांत्यपूर्व फेरीत धडक!
कुमार व मुली गटातील रोमांचक लढतींमध्ये प्रत्येकी आठ संघांची आगेकूच; मुंबई-रत्नागिरीची थरारक लढत मुंबईच्या नावावर
अहिल्यानगर (क्री. प्र.) : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने श्री बाणेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बुन्हाणनगर येथे सुरू झालेल्या 51 वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीतील रोमहर्षक सामने पार पडले. उत्कृष्ट क्रीडाप्रदर्शनाच्या जोरावर कुमार व मुली गटातील प्रत्येकी आठ संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आज (शनिवार) सकाळच्या सत्रात उपांत्यपूर्व सामने पार पडणार आहेत.
कुमार गटात धाराशिव-मुंबई, मुंबई उपनगर-पुणे, सोलापूर-ठाणे, सातारा-सांगली, तर मुली गटात धाराशिव-रत्नागिरी, नाशिक-ठाणे, सोलापूर-सातारा, पुणे-सांगली अशी दमदार आमने-सामने लढती रंगणार आहेत.
रोमहर्षक सामने व लक्षवेधी कामगिरी
सांगली विरुद्ध पालघर (कुमार गट)
सांगलीने एक डाव सहा गुणांनी विजय मिळवला. संकेत वाघमारे २.३० मि., पार्थ देवकाते २.३० मि. संरक्षण व ३ गुण, अथर्व पाटील ३.३० मि. संरक्षण व १ गुण, श्री दळवी २.१० मि. संरक्षण यांनी चमकदार कामगिरी केली. पालघरकडून प्रेम पाटीलने १.१० मि. संरक्षण व १ गुण केला.
मुंबई विरुद्ध रत्नागिरी – अटीतटीची लढत
निर्धारित वेळेत बरोबरी; जादा डावात मुंबईचा १ गुणांनी रोमांचक विजय. मुंबईकडून मनीष पालये (१.१०, १.५० व १.२० मि. संरक्षण व १ गुण), निहाल पंडित (२.००, १.०० मि. संरक्षण व ४ गुण), निमेश चौगुले (१.०० मि. संरक्षण व ५ गुण) यांनी चमक दाखवली. रत्नागिरीकडून अथर्व गराटेने ८ गुण करत सर्वांचे लक्ष वेधले.
ठाण्याने बीडवर १ डाव २४ गुणांनी मात केली. ओंकार सावंत आणि सोहम जुंगारे यांनी संरक्षणात दमदार प्रदर्शन केले. सोलापूरने धुळेवर १ डाव ४३ गुणांनी दणदणीत विजय मिळवला. अरमान शेख (४.५० मि.), रवी दरोगोंदा व अकबर शेख (२.५० मि.) सोलापूरचे नायक ठरले.
मुली गटातील झुंजार लढती
पुण्याने जालनावर १ डाव ८ गुणांनी विजय अपर्णा वर्धे (३.२० मि., २.४० मि.), श्वेता नवले (३.३० मि. व १ गुण) यांची चमकदार कामगिरी. जालनाकडून वैष्णवी मदने ४.०० मि. संरक्षण व २ गुण अशी संघर्षपूर्ण खेळी करत प्रेक्षकांची दाद मिळवली.
सांगलीने परभणीवर १ डाव २६ गुणांनी मोठा विजय नोंदवला. सांगलीच्या धनश्री तामखडे (३.०० मि. व ३ गुण), सानिका चाफे (२.२० मि. व २ गुण) यांनी परभणीवर चढाई करत विजय मिळवला.
ठाणेने धुळेवर १ डाव १७ गुणांनी विजय
धनश्री कंकने ४.३० मि., दीक्षा काटेकर ३.२० मि., प्रणिती जगदाळे ३.०० व १.१० मि. नाबाद संरक्षण, श्रुती चोरमारेने १० गुण, धुळेकडून हर्षदा कोळी २.१० मि. संरक्षण व ८ गुण.
धाराशिवने नंदुरबारवर १ डाव ३३ गुणांनी विजय,
धाराशिवच्या मिथिला पवार (४.२० मि.), राही पाटील (३.४० मि.), मुग्धा सातपुते व सिद्धी भोसले ८ गुण यांची चमक.
सोलापूरचा मुंबईवर १ डाव ११ गुणांनी विजय, सोलापूरच्या कल्याणी लामकाने (५ मि.), स्नेहा लामकाने (४ मि.) तर मुंबईची कादंबरी तेरवणकर (२ मि.) यांची चमकदार कामगिरी.
रत्नागिरी मुली संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करताना अहिल्यानगर संघावर १ डाव २४ गुणांनी दणदणीत विजय मिळवला. रत्नागिरी संघाकडून ऋषी चव्हाण ४.४० मी. संरक्षण व आक्रमणात २ गुण साक्षी लिंगायतने संरक्षणात ३.५० मी. आणि आक्रमणात ४ गुण मिळवले. आर्य दोर्लेकरने २.४० मी. संरक्षण करून आक्रमणात २ गुण मिळवले.
नाशिक उपांत्यपूर्व फेरीत दाखल. मुंबई उपनगरवर ११ गुणांनी विजय मिळवला. नाशिककडून निर्मला ४.४० मी. सुषमा चौधरी २.२० मी., रोहिणी भंवर २.०० संरक्षण केले. उपनगरकडून दिव्या गायकवाडने अष्टपैलू खेळ करत १.१० मी. संरक्षण आणि आक्रमणात ६ गुण संपादन केले.
उद्याच्या सामन्यांत रंगणार खऱ्या अर्थाने ‘युद्ध’
पुढील फेरीत पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमध्ये रंगणारी झुंज पाहण्यासाठी महाराष्ट्रातील खो-खो प्रेमींचे लक्ष खिळले आहे. मैदानावर झंझावाती गती, वेग, संरक्षणातील दमदार अचूकता आणि आक्रमणातील चतुराई पाहण्यास मिळणार आहे.

























