नाहीतर हजारो रुग्णांचा जीव टांगणीला! – आ. सत्यजीत तांबे यांचा आरोग्य विभागाला इशारा

… नाहीतर हजारो रुग्णांचा जीव टांगणीला!
– आ. सत्यजीत तांबे यांचा आरोग्य विभागाला इशारा
– श्रीगोंद्यातील सरकारी रुग्णालयाच्या उभारणीबाबत लिहिलं पत्र

प्रतिनिधी

शिक्षणासोबतच आरोग्य क्षेत्राला प्राधान्य देणाऱ्या आमदार सत्यजीत तांबे यांनी एका मोठ्या मुद्द्यावरून आरोग्य विभागाला फैलावर घेतलं. ग्रामीण भागातील आरोग्याचा प्रश्न बिकट असताना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयाला मान्यता मिळूनही हे रुग्णालय कागदावरच आहे. त्याबाबत आ. सत्यजीत तांबे यांनी चिंता व्यक्त केली असून तातडीने रुग्णालय झालं नाही, तर हजारो रुग्णांचा जीव टांगणीलाच लागलेला राहील, असा इशाराही दिला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात आरोग्य क्षेत्राचे विविध प्रश्न गेली अनेक वर्षं प्रलंबित आहेत. त्यात उपजिल्हा रुग्णालयाची उभारणी हा प्रश्न ऐरणीवर आहे. विशेष म्हणजे या रुग्णालयाच्या उभारणीला २०१३ आणि २०२२ अशी दोन वेळा प्रशासनाची मान्यता मिळाली आहे. तरीही हा प्रकल्प कागदावरच पडून आहे. शहर आणि तालुक्यात गरोदर महिला, अपघात, विषबाधा किंवा सर्पदंश झालेले रुग्ण यांच्यासाठी हक्काचे सरकारी रुग्णालय नसल्याने त्यांना पुणे, बारामती किंवा अहमदनगर गाठावे लागते. त्यामुळे या रुग्णांची ओढाताण तर होतेच, पण इतर शहरांमधील सरकारी आरोग्यव्यवस्थेवरचा ताणही वाढतो, या बाबीकडेही आ. तांबे यांनी लक्ष वेधले.

दोन वेळा प्रशासकीय मंजुरी मिळूनही श्रीगोंदा येथील उपजिल्हा सरकारी रुग्णालयाची एक वीटही अद्याप उभी राहिलेली नाही. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेबाबत एवढी अनास्था का, या प्रकरणी काही अडचण असेल, तर लोकप्रतिनिधी, स्थानिक लोक आणि प्रशासन यांच्या चर्चेतून त्यावर मार्ग निघू शकेल, असंही आ. तांबे यांनी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत याना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

शहरात जवळपास मोठे रुग्णालय उपलब्ध नसल्याने श्रीगोंद्यातील रुग्णांची दुरावस्था होत आहे. पर्यायाने श्रीगोंद्याच्या रुग्णांना बारामती, पुणे, नगरमध्ये जावे लागते आणि त्यामुळे तिकडच्या रुग्णालयांवर अधिक ताण वाढतो. श्रीगोंद्यातील रुग्णांचीही प्रचंड गैरसोय होते. त्यामुळे सरकारने तातडीने यावर उपाययोजना करावी. – आ. सत्यजीत तांबे