आदिवासी क्रांतीवीरांच्या नेतृत्वाचा इतिहास लिहिण्याची आज नितांत गरज आहे’.-प्रा.दिलीप गिर्हे

आदिवासी क्रांतीवीरांच्या नेतृत्वाचा इतिहास लिहिण्याची आज नितांत गरज आहे’.-प्रा.दिलीप गिर्हे

चोपडा: येथे राष्ट्रीय जनजाती आयोग, नवी दिल्ली व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, विद्यार्थी विकास विभाग तसेच महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आदिवासी क्रांतिवीरांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान’ या विषयावरील ‘पोस्टर प्रदर्शन’ व ‘व्याख्यान’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रीय जनजाती आयोगाचे प्रतिनिधी विठ्ठल म्याकलवाड यांच्या हस्ते फीत कापून ‘पोस्टर स्पर्धा व प्रदर्शनाचे’ उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य एन. एस. कोल्हे, उपप्राचार्य प्रा.डॉ. के. एन.सोनवणे, वक्ते प्रा. दिलीप बी. गिर्हे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.शैलेशकुमार वाघ, परीक्षक डॉ. मारोती गायकवाड, परीक्षक इतिहास विभाग प्रमुख सौ.सुनिता पाटील, डॉ.ए.बी. सूर्यवंशी, पंकज महाविद्यालयातील विद्यार्थी विकास अधिकारी सुनील सुरवाडे, सौ. मायाताई शिंदे आदी मान्यवर उपस्थिती होते.या पोस्टर स्पर्धेत चोपडा शहरातील विविध महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या प्रदर्शनात देशातील ७० हून अधिक आदिवासी क्रांतीवीरांची माहिती असलेले पोस्टर लावण्यात आले होते. यावेळी आदिवासी क्रांतीवीरांवरील पोस्टर प्रदर्शनास २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी भेट दिली व आदिवासी क्रांतिवीरांचा इतिहास समजावून घेतला.
‘आदिवासी क्रांतिवीरांचे स्वातंत्र लढ्यातील योगदान’ या विषयावरील व्याख्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन.एस.कोल्हे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. यावेळी मार्गदर्शक व राष्ट्रीय जनजाती आयोगाचे प्रतिनिधी विठ्ठल म्याकलवाड, मार्गदर्शक प्रा.दिलीप गिर्हे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.शैलेशकुमार वाघ, पंकज महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी सुनील सुरवाडे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.शैलेशकुमार वाघ यांनी केले. यावेळी ‘आदिवासी क्रांतिवीरांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान’ या विषयावर बोलताना मार्गदर्शक विठ्ठल म्याकलवाड म्हणाले की, ‘देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आदिवासी क्रांतीवीरांचे मोठे योगदान आहे म्हणून त्यांचा इतिहास व योगदानाविषयी विद्यार्थ्यांना माहिती व्हायला हवी व समाज जागृती व्हावी हा उद्देश आहे.आदिवासी क्रांतिवीरांचा वैभवशाली इतिहास, त्याची ओळख करून घेतली पाहिजे व आजच्या आदिवासी युवकांनी आदिवासी क्रांतीवीरांच्या इतिहासावर संशोधन करायला हवे’. यावेळी आयोजित केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले व देशभरातील आदिवासी क्रांतिवीरांनी केलेले लढे, उठाव व कार्य यांची तसेच राष्ट्रीय जनजाती आयोग नवी दिल्ली यांच्या कार्याची सविस्तर माहिती करून दिली.
याप्रसंगी वक्ते प्रा.दिलीप गिर्हे मार्गदर्शन करताना म्हणाले की, ‘आदिवासींचा इतिहास पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनातून लिहिला गेला आहे. त्यातील चुका सुधारून आदिवासींचा लढा जल, जंगल, जमीन याचबरोबर अस्तित्वासाठी देखील होता हेही समजून घेणे गरजेचे आहे. आदिवासी क्रांतीवीरांच्या नेतृत्वाचा इतिहास सदसदविवेकबुद्धीने लिहिण्याची आज नितांत गरज आहे’.
या कार्यक्रमाप्रसंगी कोमुरम भीम या आदिवासी क्रांतिवीराच्या जीवनावर आधारित आदिवासी क्रांतीगीताची चित्रफीत दाखविण्यात आली. यावेळी ‘आदिवासी क्रांतीवीरांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान’ या विषयावरील आयोजित केलेल्या ‘पोस्टर स्पर्धेत’ प्रथम क्रमांक प्राप्त रिहवु रेवना बारेला, पंकज महाविद्यालय चोपडा, द्वितीय क्रमांक प्राप्त भाग्यश्री शामकांत बोरसे कला,शास्त्र वाणिज्य महाविद्यालय चोपडा, तृतीय क्रमांक प्राप्त रीना दगडू तडवी कला, शास्त्र वाणिज्य, महाविद्यालय, चोपडा आणि उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त अक्षय चंदुलाल कोळी व हर्षदा जनार्दन कोळी त्याचप्रमाणे निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त सोनवणे गायत्री ज्ञानेश्वर शिक्षणशास्त्र महाविद्यालय, चोपडा व द्वितीय क्रमांक प्राप्त रूपाली मुरलीधर बळीराम शिक्षणशास्त्र महाविद्यालय, चोपडा या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व आदिवासी गझल संग्रह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी उपप्राचार्य एन.एस.कोल्हे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ‘आदिवासी संस्कृतीवर आज मोठ्या प्रमाणावर आक्रमण होते आहे, त्यांची संस्कृती व ओळख पुसण्याचे काम केले जात आहे. यावर आजच्या संशोधक व सुशिक्षित पिढीने गंभीर चिंतन करायला हवे. त्याचप्रमाणे आदिवासी विद्यार्थ्यांनी मूलभूत अधिकार, हक्क व कायद्यांची ओळख करून घेणे काळाची गरज आहे. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम समन्वयक डॉ.एम.एल.भुसारे यांनी केले तर आभार सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डी.डी.कर्दपवार यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पी.एस. पाडवी, डॉ.सी.आर.देवरे, डॉ.आर.आर.पाटील, एस. जी. पाटील, एम.बी.पावरा, चेतन बाविस्कर, शाहीन पठाण तसेच मुस्कान पठान, प्रिती तुळस्कर, अजिंक्य मोरे, गजानन कोळी यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.