छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे जळगावात 11 ते 15 मार्च दरम्यान आयोजन

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे
जळगावात 11 ते 15 मार्च दरम्यान आयोजन
स्पर्धेचे काटेकोरपणे नियोजन करावे – क्रीडामंत्री गिरीष महाजन

जळगाव, दि. 4 क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या आयोजनाचा मान जळगाव जिल्ह्यास मिळाला आहे. ही जिल्ह्यासाठी गौरवाची बाब असल्याने या स्पर्धेचे सर्व संबंधितांनी काटेकोरपणे नियोजन करावे. अशा सूचना राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी दिल्यात.
छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 11 ते 15 मार्च, 2023 दरम्यान सागरपार्क मैदानावर होणार आहे. या स्पर्धेच्या आयोजन समितीची बैठक क्रीडामंत्री श्री. महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस खासदार उन्मेष पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी पंकज आशिया, नाशिक विभागाच्या क्रीडा उपसंचालक सुनंदा पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित, शाम कोगटा, नितीन बरडे, डॉ प्रदिप तळवेलकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
क्रीडामंत्री पुढे म्हणाले की, जळगाव जिल्ह्याला कबड्डीची चांगली परंपरा आहे. जिल्ह्यातील कबड्डीपट्टूनी अनेक स्पर्धा गाजविल्या आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने जिल्हावासियांना एक आनंदाची पर्वणी राहणार असल्याने या स्पर्धेच्या आयोजनात कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी. या स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या सर्व समित्यांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडावी.
छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 11 ते 15 मार्च, 2023 या कालावधीत सागरपार्क मैदान येथे संपन्न होणार आहेत. या स्पर्धांसाठी राज्यातील विविध जिल्ह्याचे पुरुषांचे 16 व महिलांचे 16 असे एकूण बत्तीस संघ सहभागी होणार आहे. या संघामध्ये विविध राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांत खेळलेल्या खेळाडूंचा समावेश असणार आहे. प्रत्येक संघातील 12 खेळाडू, 1 क्रीडा मार्गदर्शक व 1 व्यवस्थापक असा एकूण 14 जणांचा समावेश राहील. या स्पर्धेत 384 कबड्डीपट्टू, 100 सरपंच, पंच व पदाधिकारी, अधिकारी तसेच 50 स्वयंसेवक व समिती सदस्य असे एकूण 550 जण सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी सागरपार्क मैदानावर चार कबड्डीचे मैदान तयार करण्यात येणार आहेत. या स्पर्धेत अंतिम विजेत्या संघाला 1 लाख 50 हजार रुपयांचे तर उपविजेत्या संघाला एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय सहभागी व इतर संघानाही बक्षिसे देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडू व इतर यांची भोजन, निवास, प्रवास खर्च देण्यात येणार असून प्रेक्षकांसाठी सागरपार्क मैदानावर प्रेक्षक गॅलरी उभारण्यात येणार असल्याचे क्रीडा उपसंचालक श्रीमती सुनंदा पाटील यांनी सांगितले. स्पर्धेचे प्राथमिक नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. मित्तल यांनी बैठकीत दिली.
या स्पर्धेच्या आयोजनासाठी जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशन तसेच स्थानिक पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांचेही सहकार्य लाभणार आहे. बैठकीत खासदार श्री. पाटील, आमदार श्री. पाटील, भोळे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी विविध उपयुक्त सुचना मांडल्या. या सुचनांवर कार्यवाही करण्याचे निर्देश क्रीडामंत्र्यांनी बैठकीत सांगितले.