महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डीसेंबर १९५६ च्या महा परीनिर्वाण दिनाच्या अंतिम क्षणासह अखेरच्या तिन दिवसाची आठवण

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डीसेंबर १९५६ च्या महा परीनिर्वाण दिनाच्या अंतिम क्षणासह अखेरच्या तिन दिवसाची आठवण

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा )

रविवार दिनांक २ डिसेंबर १९५६ ला नानकचंद रत्तू सकाळी नेहमीप्रमाणे सव्वा सात वाजता बाबासाहेबांना भेटायला आले होते तेव्हा बाबासाहेब घरातील अंथुरणा वरच पडून होते.त्याला पाहताच बाबासाहेब म्हणाले बरं झालं आज वेळेवर आलास,आज आपल्याला खूप महत्त्वाचे काम करायचे आहे.लगेचच बाबासाहेब अंथुरणातून उठले त्यांनी चहा घेतला आणि कार्ल मार्क्स यांनी लिहिलेल्या “दास कॅपिटल” या ग्रंथातील काही मजकूर आपल्या डोळ्यां खालून घातला. व “बुद्ध आणि त्यांचा ड्रामा” या ग्रंथाच्या लेखनासाठी बसले. लिहिलेला मजकूर नानकचंद याला टाईप करायला देत होते. हे काम त्या दिवशी संध्याकाळ पर्यंत चालले होते .दिनांक ४ डिसेंबर १९५६ ला बाबासाहेब सकाळी ८-४५ ला अंथुरणातून उठले. त्या दिवशी सकाळी ११ वाजता बाबासाहेबांना भेटायला जैन धर्माचे काही लोक आले होते.त्यांनी या महत्त्वाच्या बाबतीत विचार विनिमय करावा अशी विनंती डॉ आंबेडकर यांना केली होती.परंतू बाबासाहेब त्यांना म्हणाले की या विषयावर आपण उद्या रात्री ८-३० च्या नंतर चर्चा करू.

दिनांक ५ डिसेंबर १९५६ ला नानकचंद हे ऑफिस सुटल्या बरोबर थेट बाबासाहेबांच्या बंगल्यावरच आले. तत्पुर्वी बाबासाहेबांचा नोकर सुदाम याने त्यांना फोन ही केलेला होताच. बाबासाहेबांना अजिबात झोपच लागत नव्हती. ते अस्वस्थ झाले होते.अशा परिस्थितीतही डॉ बाबासाहेब आंबेडकर हे अधून मधून “बुद्ध आणि त्यांचा ड्रामा” या ग्रंथांचा मजकूर लिहित होते. ३-४ कागद लिहून झाले होते. तेव्हा नानकचंद हे सायंकाळी ५-३० वाजता बाबासाहेबांना भेटायला आले. त्यावेळी बाबासाहेबांचा चेहरा सुकल्या सारखा झालेला दिसत होता.व ते काहीसे अस्वस्थ अवस्थेतच असलेले त्यांना दिसले. त्यांनी नानकचंदला मजकूर लिहिलेले कागद टाईप करण्यास दिले. त्यानंतर काही वेळ गेल्यानंतर रात्री बाबासाहेब डोळे मिटून हळू आवाजात”बुद्धं शरणं गच्छामि” हे त्रिशरण म्हणू लागले.त्यानंतर त्यांनी नानकचंद ला “बुद्ध भक्तिगीते” ही रेकॉर्ड लावायला सांगितली व त्या गीतांबरोबर आपणही छोट्या आवाजात ते गीत गुणगुणू लागले.नोकराने त्यांना जेवण आणले तेव्हा बाबासाहेब म्हणाले की आता मला जेवणाची इच्छा नाही. पंरतु नानकचंदने त्यांना अतिशय आग्रह करत जेवायला उठवले होते.डायनिंग हॉलच्या दोन्ही बाजूंना भिंतींच्या कडेने ग्रंथांची कपाटे रांगेत लावलेली होती. त्या ग्रंथांच्या कपाटांना पाहत पाहत बाबासाहेबांनी एक दीर्घ श्वास सोडला.आणि हळूहळू चालत डायनिंग टेबलापाशी गेले. इच्छा नसतांनाही त्यांनी नानकचंदच्या आग्रहास्तव दोन घास पोटात टाकले.नंतर नानकचंदला डोक्याला तेल लावून मसाज करायला सांगितले.मसाज केल्यानंतर ते काठीच्या साहाय्याने उभे राहिले आणि एकदम मोठ्या आवाजात म्हणाले की “चल उचल कबीरा तेरा भवसागर डेरा.”

त्यावेळी ते फार थकलेले दिसत होते.त्यांचा चेहराही एकदम निस्तेज झालेला दिसत होता. त्यांच्या डोळ्यावर गुंगी येत त्यांना झोप येऊ लागली होती. त्याच वेळी नानकचंदने त्यांना आपल्या स्वतःच्या घराकडे जाण्याची परवानगी मागितली होती. तेव्हा ते म्हणाले होते की” आता जा पण उद्या सकाळी लवकर ये. हा लिहिलेला मजकूर टाईप करावयाचा आहे.

नानकचंद हे आपल्या घरी जायला निघाले होते तेव्हा रात्रीचे सव्वा अकरा वाजले होते.

दिनांक ६ डिसेंबर १९५६ ला नानाकचंद सकाळी नेहमीपेक्षा अतिशय उशीरानेच उठले होते. ते बाबासाहेबांकडे जाण्यासाठी सायकल बाहेर काढणार तोच दारावर येऊन उभा राहिलेला सुदाम त्यांना दिसला. तो म्हणाला की माईसाहेबांनी तुम्हांला लगेचच तातडीने अर्जंट बोलावले आहे. नानाकचंद हे ऐकताच तसेच थेट बाबासाहेबा कडे जाण्यासाठी अत्यंत घाईघाईने निघाले होते.त्यांनी सुदामला विचारले की माईने मला एवढ्या घाईघाईने का बोलावले आहे.पण सुदाम काहीच बोलला नाही.नानकचंद हे बंगल्यावर पोहचतात ते थेट बाबासाहेबांच्या अंथुरणा जवळ गेले आणि मोठ्याने म्हणाले की बाबासाहेब मी आलोय,पण तिकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही.त्यांनी बाबासाहेबांच्या अंगाला हात लावला तेव्हा त्यांना बाबासाहेबांचे अंग अतिशय गरम असल्याचे जाणवले म्हणून ते त्यांच्या छातीला तेल लावून मसाज करू लागले. बाबासाहेबांना ऑक्सिजन ही देण्याचा प्रयत्न केला पण हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले होते. हे जेव्हा त्यांना कळून चुकले आणि त्यांच्या लक्षात आले की , बाबासाहेबांच्या जीवनातील प्रचंड बुद्धिमत्तेच्या अध्यायातील आलेखाचा ग्रंथ हा आता कायमचाच संपलेला आहे.बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या सर्वांना पोरके करून इहलोकीची यात्रा संपवून

गेल्याचे पाहताच नानकचंद यांच्या लक्षात आले.ते मोठ मोठ्याने रडू लागले. बंगल्यातील सर्व जण त्या ठिकाणी जमा झाले.बंगल्या समोरील झाडांची देखभाल करणाऱ्या माळ्याने तर बाबासाहेबांच्या पायावर लोटांगण घातले आणि तो ही जोरजोरात हंबरडा फोडून रडू लागला होता.

पुढील व्यवस्था करायची म्हणून नानकचंद यांनी ६ डीसेंबर १९५६ रोजी सकाळी ९ वाजता सर्वांना फोन करण्यास सुरवात केली होती.रडत रडत त्यांनी फोन करत बाबासाहेब आंबेडकर गेल्याची बातमी सर्वांना कळविली होती. मग बाबासाहेबांचा पार्थिव देह अंत्यविधी साठी थेट विमानाने मुंबई येथील “राजगृह” येथे आणण्यात येणार आहे ही बातमी वाऱ्या सारखी मुंबईतील लोकांना कळाली तेव्हा लोकांचे थवेच्याथवे विमानतळाकडे धाऊ लागले होते. दिल्लीहून बाबासाहेबांचा पार्थिव देह घेऊन विमान मुंबईच्या दिशेने निघाले होते. हे विमान मुंबईतील सांताक्रूझ विमानतळावर रात्री उशिरा उतरले होते.तेथे अगोदरच पुढील सर्व व्यवस्था करण्यात आली होती. बाबासाहेबांचा पार्थिव देह ठेवलेली रुग्णवाहीका विमान तळावरून थेट राजगृहाकडे जाण्यासाठी निघाली तेव्हा बाबासाहेबांचे चाहते अनुयायी असलेले हजारो लोक बाहेर अतिशय थंडी असताना ही कुडकुडतच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी हातात हार घेऊन बाबासाहेबांना अखेरची पुष्पांजली अर्पण करण्यासाठी डोळ्यातून अश्रूंना वाट करून देत रडत उभे होते. वंदना घेत घेत बाबासाहेबांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका जेव्हा हळूहळू चालत राजगृहा जवळ आली. तेव्हा राजगृहापुढे जमलेल्या लाखो लोकांनी हंबरडा फोडून त्यांच्या तोंडातून एकच किंकाळीचा आर्त स्वर निघाला “बाबा”….? असे म्हणत ते सर्व जण रडू लागले होते. तेथे जमलेल्या असंख्य माता भगिनी

यांचा प्रचंड आक्रोश जोरात सुरू झाला होता. अनेक मातांनी आपली लहान मुले बाबा साहेबांच्या चरणावर घालून त्यांचे अंत्यदर्शन घेतले होते.काही महीलांनी तर थेट भिंतीवर डोके आपटून आपला आक्रोश व्यक्त केला होता.त्यावेळी अनेक जणी चक्कर येऊन मुर्च्छित होउन पडल्या होत्या.त्यावेळी

हिंदू कॉलनीतील सवर्ण समाजातील अनेक हिंदू लोकांना बाबासाहेबांच्या पार्थिव देहाचे अंत्यदर्शन घेण्या साठीच्या रांगेत तीन-चार तास उभे राहावे लागले होते.हिंदू कॉलनीतील लोकांनी आमच्या वस्तीतील “ज्ञानियांचा राजा गेला आहे आमच्या हिंदू कॉलनीचे भूषण हरवले आहे” असे म्हणत हंबरडा फोडला होता. एवढी मोठी लाखो लोकांची

गर्दी जरी तेथे जमली होती तरी लोक बाबासाहेबांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी अतिशय शिस्तीने रांगेत उभे होते.

बाबासाहेबांचा पार्थिव देह राजगृहात आणल्यानंतर तेथे बौद्ध भिख्खूंनी धार्मिक विधी पार पाडला होता. त्यांनी हा विधी अत्यंत साधेपणाने केला होता.त्यानंतर बाबासाहेबांच्या पार्थिव देहावर पावित्र्याचे व मांगल्याचे निर्देशक असलेली पांढरीशुभ्र वस्त्रे चढविण्यात आली होती.त्याचवेळी बाबासाहेबांच्या पार्थिव शरीराजवळ असंख्य मेणबत्त्या पेटवण्यात आल्या होत्या.त्यांच्या उशाला बुद्धांची एक मूर्ती ठेवण्यात आली होती. दुपारी एक वाजेपर्यंत सुमारे दोनलाख लोकांनी बाबासाहेबांचे अंत्यदर्शन घेतले होते. बाबासाहेबांच्या दुःखद निधनामुळे सुमारे दोन लाख गिरणी कामगारांनी काम बंद ठेवून दुखवटा पाळला होता. त्यामुळे त्या दिवशी पंचवीस कापड गिरण्या पूर्णपणे बंद होत्या.अनेकांनी आपली दुकाने बंद ठेवलेली होती. शाळा महाविद्यालया तील अनेक विद्यार्थ्यांनी शोक व्यक्त करीत या अंत्य यात्रेत सहभाग घेतला होता.

एका सजवलेल्या ट्रकवर बाबासाहेबांचा पार्थिव देह ठेवण्यात आला होता.त्याशेजारीच मागिल बाजूस बुद्धांची मूर्ती ठेवण्यात आली होती. त्यांच्या पार्थिवा शेजारीच त्यांचे पुत्र यशवंतराव(उर्फ भय्यासाहेब आंबेडकर) व पुतणे मुकुंदराव आंबेडकर हे बसले होते.अंत्ययात्रेची लांबी सुमारे तीन किलोमीटर पर्यंत लांब होती. किमान दहा लाख लोकांनी भारताच्या या महान तपस्वी बंडखोर सुपुत्राचे अंत्यदर्शन घेण्यासाठी रस्त्यावरील मार्गावर दुतर्फा गर्दी केली होती. रस्त्यावर एवढी मोठी प्रचंड गर्दी असतानाही बेशिस्त वर्तनाचा एकही प्रकार कुठेही घडलेला दिसून आला नाही.अशाप्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अंत्ययात्रा परळ नाक्यापासून निघाली होती. सदर अंत्ययात्रा एल्फिन्स्टन रोडकडे निघाली तेव्हा सर्वत्र जिकडे तिकडे लोकच लोक दिसत होते.बरोबर दिनांक ७ डिसेंबर १९५६ रोजी सायंकाळी ५ वाजता अंतिम महायात्रा दादरच्या चौपाटी वर आली होती.डॉ. बाबासाहेबांच्या पार्थिवाला अग्नी देण्यासाठी भागेश्वर स्मशान भूमीतच समुद्राच्या बाजूच्या भिंतीजवळ वाळूचा एक प्रचंड चौथरा तयार करण्यात आला होता. बाबासाहेबांचा पार्थिव देह ट्रकच्या खाली उतरविण्यात आला होता.मेणबत्यांचे तबके घेतलेले चार भिख्खू सर्वात पुढे होते. बाबासाहेबांचा पार्थिव देह सर्वांना दिसेल अशाप्रकारे एका उंच व्यासपीठावर ठेवण्यात आला होता.महाराष्ट्र शासनाच्या वतीने बाबासाहेबांच्या पार्थिव देहाला पुष्पहार अर्पण करण्यात आला होता.मुंबईतील आणि मुंबई बाहेरील अनेक ठिकाणची नामांकित प्रमुख मंडळी ‌यावेळी उपस्थित होती. बौद्ध भिक्खूंनी धार्मिक पद्धतीने अंतिम विधीस प्रारंभ केला तेव्हाचे करूण दृश्य पाहतांना पाणावलेल्या अनेकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. बाबासाहेबांच्या अंत्य यात्रे नंतर अंत्यविधी हा आनंद कौसल्यायन यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आला होता. शेवटच्या क्षणी बाबासाहेबांचा पार्थिव देह हा चंदनाच्या चितेवर चढविण्यात आला होता.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पार्थिवाला सरकारी इतमामाने सशत्र पोलीस दलाने हवेत तिनं वेळा बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. बिगुलाच्या अतिशय गंभीर स्वरात त्यांच्या देहाला बाबासाहेबांचे पुत्र यशवंतराव यांच्या हस्ते सायंकाळी सव्वा सात वाजता अग्नी देण्यात आला होता.बाबासाहेबांच्या पार्थिव देहाला अग्नी देताच त्यांच्या आप्त स्वकीयांना संयम आवरता आला नाही ते बाबासाहेबांच्या चीतेकडे धावले आणि ढसढसा रडू लागले होते. शेवटी त्यांनी पुन्हा एकदा बाबासाहेबांचे शेवटचे अंतिम दर्शन घेतले. आणि काही क्षणातच बाबासाहेबांचा पार्थिव देह कायमचा अनंतात विलीन झाला.

रविवार दिनांक ९ डिसेंबर १९५६ रोजी सकाळी ८ वाजता दादर येथील चौपाटीवर अथांग वाळूच्या पटांगणात जाहीर शोकसभा घेण्यात आली. या लोकसभेच्या अध्यक्ष स्थानी भदंत कौसल्यायन हे होते.यावेळी राज्यातील अनेक नेते उपस्थित होते. अनेकांची आदरांजली पर भाषणे झाली. श्रीमती रेणू चक्रवर्ती यांनी आपल्या भाषणात असे सांगितले की आम्हा तरुण सभासदांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सान्निध्यात राहण्याचा आणि त्यांच्या बरोबर काम करण्याचा सुयोग मिळाला नाही. डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटना व हिंदू कायद्याची जी आचारसंहिता लिहून ठेवली तीची मुळ प्रत तयार करण्यात आली होती.ती अतिशय उत्कृष्ट होती.आणि जोपर्यंत या दोन कृती भारतात अस्तीत्वात राहतील तोपर्यंत आंबेडकरांच्या अद्वितीय बुद्धीमत्तेचा व कर्तुत्वाचा स्मृतीदीप भारतात कायम अखंड तेवत राहील असे सांगण्यात आले होते.हिंदू समाजातील पिडीत व दलित लोकांना त्यांनी ज्ञानाची संजीवनी पाजून जिवंत आणि जागृत करत आपल्या अधिकार आणि मानवी हक्कांसाठी लढण्यास प्रवृत्त करूण उभे केले होते.तसेच त्यांनी पददलितां बद्दलची वरिष्ठ वर्गाची दृष्टीही बदलून टाकली होती हे त्यांचे अमुलाग्र थोर राष्ट्रकार्य होय.

त्यानंतर आचार्य अत्रे यांनी सुद्धा भाषण केले होते आपल्या भाषणात ते म्हणाले होते की या महान नेत्याच्या मृत्युच्या मृत्यूने मृत्यूलाच कीव वाटू लागली आहे. आज मरणानेच आपले हसू करून घेतले आहे .मृत्यूला काय दुसरी माणसे दिसली नाहीत का? मग त्याने जगात इतिहास निर्माण करण्याऱ्या एका महान संजीवनाच्या या ग्रंथावर आणि इतिहासाच्या एका पर्वावरच का झडप घातली ? बाबासाहेबा मुळे भारताला महापुरुषांची वाण कधीच पडली नाही.परंतु भविष्यात असा महामानव युगपुरुष शतकानू शतकात कधीही होणार नाही. बाबासाहेबांचा स्वभाव म्हणजे झंझावाताला मागे सारणारा व महासागराच्या लाटांसारखा त्यांचा अवखळ स्वभाव होता. जन्मभर त्यांनी बंडच केले. त्या काळात आंबेडकर म्हणजे बंड असे समिकरणच तयार झाले होते.असा बंडखोर शूरवीर , बहाद्दर पुरुष आज मृत्युच्या चिरनिद्रेच्या मांडीवर कायमचा विसावा घेत होता. त्यांचे कितीही वर्णन केले तरी ते करण्यास शब्दच अपुरे पडतात.या आंबेडकर रुपी

महामानवास महापरीनिर्वाण दिना निमित्त माझे कोटी कोटी सलाम,सादर

प्रणाम,त्रिवार विनम्र अभिवादन आणि अंतःकरण पूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण.🌹🌹🌹🌹🌹

जयभीम,नमो बुद्धाय,जय भारत,बुद्धं शरणं गच्छामी!!! साभार…… सुनिल नजन अहिल्यानगर, ९८५०१०६५२२