जळगावात एफ सी बायर्न महाराष्ट्र कप फूटबॉल स्पर्धेचे 9 फेब्रुवारी रोजी आयोजन

जळगावात एफ सी बायर्न महाराष्ट्र कप फूटबॉल स्पर्धेचे 9 फेब्रुवारी रोजी आयोजन

जळगाव, राज्यात फुटबॉल खेळाच्या विकास व प्रसारासाठी फुटबॉल क्लब बायर्न म्युनिक, जर्मनी यांचेशी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्यावतीने करारनामा झाला आहे. फुटबॉल क्लब बायर्न म्युनिक जर्मनी हा जागतिक अग्रगण्य लोकप्रिय फुटबॉल क्लबपैकी एक आहे. या करारनाम्यामुळे राज्यातील फुटबॉल खेळाची लोकप्रियता वाढीस लागेल. खेळाडु व क्रीडा मार्गदर्शक यांना फुटबॉल खेळातील तांत्रिक प्रशिक्षण, क्रीडा नैपुण्याचा शोध घेण्यासाठी तसेच योजनाबध्द प्रशिक्षण, पायाभुत सुविधा यांना चालना मिळणार आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच फुटबॉल क्लब बायर्न यांचे करारामध्ये क्रीडा नैपुण्याचा शोध घेवून त्यांना जर्मन येथे प्रशिक्षण देण्यासाठी मुद्दा नमुद असुन याअंतर्गत राज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या ” एफ.सी.बायर्न महाराष्ट्र कप ” स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. फुटबॉल क्लब बायर्न यांच्याशी झालेल्या करारनाम्यामुळे राज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धा आयोजित करुन त्यातुन निवडलेल्या २० खेळाडुना म्युनिक, जर्मनी येथे जाणे-येणे, तेथील निवास, प्रशिक्षण इ. बाबीवरील खर्च करण्यात येणार आहे.
राज्यातुन २० खेळाडु जर्मनी येथे सदर प्रशिक्षणासाठी जाण्याकरिता क्रीडा नैपुण्याचा शोध घेण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अंतर्गत एफ.सी.बायर्न महाराष्ट्र कप स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर करण्यात येणार आहे. या फुटबॉल स्पर्धा १४ वर्षाखालील मुलांच्या गटात घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासन व फुटबॉल क्लब बायर्न व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने खालीलप्रमाणे १४ वयोगट मुले यांच्या स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे.
एफ. सी. बायर्न महाराष्ट्र कप (फुटबॉल) स्पर्धेकरिता सहभागी होणाऱ्या खेळाडुंसाठी वयोगट १४ वर्षाखालील मुले, दिनांक 1 जानेवारी, 2009 नंतर जन्मलेला असावा., खेळाडू संख्या मुले २० व मार्गदर्शक व्यवस्थापक २ अशी एकुण २२ राहील. यासाठी एम के पाटील, क्रीडा अधिकारी 9423027475 श्री अब्दुल मोहसील 83920000143 यांचेशी संपर्क साधावा. तसेच श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे 9 फेब्रुवारी, 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता उपस्थित रहावे.
तरी सदर स्पर्धेत वरील कार्यक्रमानुसार मोठया संख्येने सहभागी होवून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी त्यांचे प्रवेश अर्ज खेळाडूंचे इलिजीबीलीटी फॉर्म व त्यासोबत खेळाडूंचा जन्मतारखेचा दाखला जोडून स्पर्धेच्या दिवशी सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षीत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.