चोपडा महाविद्यालयात रंगले ‘खुले कवी संमेलन’

चोपडा महाविद्यालयात रंगले ‘खुले कवी संमेलन’

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित ‘खुल्या कविसंमेलनाचे’ आयोजन करण्यात आले होते.
या कवी संमेलनाचे उदघाटन खान्देशातील सुप्रसिद्ध कविवर्य श्री.अशोक नीळकंठ सोनवणे यांच्या हस्ते कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी उपस्थित होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी, खानदेशातील सुप्रसिद्ध कवी श्री. अशोक निळकंठ सोनवणे, सुप्रसिद्ध वात्रटिकाकार कविवर्य श्री.विलास पाटील, सुप्रसिद्ध कवयित्री व गझलकार सौ. योगिता पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री.बी.एस.हळपे, सौ.एम.टी.शिंदे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सौ.एम. टी.शिंदे म्हणाल्या की, ‘विद्यार्थ्यांना कवी संमेलनाच्या माध्यमातून कविता ऐकता याव्यात तसेच विद्यार्थ्यांमधील काव्य लेखन कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे हा या कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश आहे.
याप्रसंगी कविवर्य अशोक नीळकंठ सोनवणे आपल्या सादरीकरणाप्रसंगी म्हणाले की, ‘कवितेला १२ व्या शतकाच्या आधीपासूनचा इतिहास आहे.१९६० नंतर कवितेला नवी उभारी लाभली.त्याचबरोबर १९९० नंतर कवितेत ताल, लय साधणारी कविता लिहिली गेली. कविता लेखन करण्यासाठी अनेक कवींच्या कवितांचे वाचन करणे गरजेचे आहे. यावेळी त्यांनी कवीच्या प्रेत यात्रेचे वर्णन कवितेद्वारे केले.तसेच त्यांच्या
‘दिवे लागणीला तुझी याद यावी,
तुझ्या ह्रदयात साद घालावी’ या कवितांना प्रेक्षकांनी प्रचंड दाद दिली.
यावेळी गझलकार व कवयित्री सौ.योगिता पाटील यांनी सांगितले की, ‘गझल ही अनेकांगी विषयावर लिहिली जाते.गझलेतून कोणताही विषय अधिक प्रभावीपणे मांडला जातो. याप्रसंगी त्यांनी
‘घडून जाते घटना मग त्यानंतर घटना होते’,
ती काही बोलत नाही तो काही बोलत नाही ‘नजरेला नजर भिडते त्यावर मग चर्चा होते’, तसेच
‘कशाला एवढे उडता मुलांनो
जरा शिस्तीमध्ये वागा मुलांनो’ त्याचप्रमाणे
‘झुल्याविना सारखे इथे झुलायचे आहे’, ‘घुमतो आहे दिशा-दिशातून नाद छत्रपती शिवाजी’ इत्यादी एकापेक्षा एक सरस गझल सादर करून रसिकांची वाहवा मिळविली.
प्रसिद्ध विडंबनकार व कवी विलास पाटील यांनी ‘देखीसन तीनं तिरपं देखना
गयरा खुश व्होऊ मी, ‘सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी’, ‘अरे टक्कल टक्कल, जसा चंद्र डोक्यावर’, ‘दिवस तुझे हे एफ.वाय.चे’ अशा अनेक विडंबन कविता सादर करून रसिकांना पोट धरून हसविले.
यावेळी श्री.निवृत्ती पाटील यांनी ‘नको खाऊ जर्दा, माझं ऐक जरा मर्दा’ या सादर केलेल्या कवितेला प्रचंड दाद मिळाली. शाहीन पठाण यांनी ‘बाबांची लेक’, माया धनगर हिने ‘मेरे वतन के लाल’, हर्षदा पाटील हिने ‘बाबा’, दिनेश पाटील याने ‘आई तूच माझं धैर्य’ तसेच श्री.एन. बी.शिरसाठ यांनी ‘हिंदुस्तान मे रहेंगे’ इत्यादींनी आपल्या कवितांचे सादरीकरण करून कार्यक्रमात रंगत आणली.
याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना अशा कार्यक्रमातून खुले व्यासपीठ प्राप्त करून देणे गरजेचे आहे. कवी आपली कविता ही अनुभवातून व निरीक्षणातून लिहितो.कवितेचा आस्वाद घेण्यासाठी रसिकांनी भावार्थ लक्षात घेतला पाहिजे.यावेळी त्यांनी सादरीकरण केलेल्या कवितांचे व कवींचे कौतुक केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.एम.एल. भुसारे यांनी केले तर आभार श्री.जी.बी.बडगुजर यांनी मानले. या कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.